बीड

पुढील वर्षी मराठ्यांनी सहकुटुंब शिवनेरीवर जाऊन शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे” – मनोज जरांगे पाटील

पुढील वर्षी मराठ्यांनी सहकुटुंब शिवनेरीवर जाऊन शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हावे” – मनोज जरांगे पाटील

मनोज दादांच्या नेतृत्वात “दरवर्षी बीडमध्ये भव्य – दिव्य शिवजयंती साजरी करणार” – गंगाधर काळकुटे

शिवकालीन मर्दानी खेळांनी शिवजयंती उत्सवात बीडकरांचे लक्ष वेधले !
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर उत्साह, शौर्य आणि प्रेरणेचा संगम !!

बीड (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज क्रीडांगणावर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मर्दानी खेळांच्या कार्यक्रमाने बीडकरांचे लक्ष वेधून घेतले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक युद्धकलेच्या थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना शिवकालीन शौर्याची अनुभूती दिली. संपूर्ण मैदान “जय शिवराय”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मनोज जरांगे पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या आगमनावेळी पारंपरिक औक्षण करण्यात आले. गंगाधर नाना काळकुटे, दीपक काळकुटे व मराठा सेवकांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले की, “पुढील वर्षी मराठा बांधवांनी सहकुटुंब शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावे. शिवरायांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी एकत्र राहणे हीच खरी जयंती ठरेल.” त्यांनी तरुणांनी व्यसनमुक्त राहून समाजकार्यात पुढे यावे, असेही स्पष्ट केले.

कार्यक्रमात मराठा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले.

कार्यक्रमाचे आयोजक गंगाधर नाना काळकुटे यांनी सांगितले की, “येथून पुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम याच ठिकाणी अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात घेण्यात येईल. विविध क्षेत्रातील व्याख्याते बोलावून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबविण्यात येतील. मराठा युवक व बहुजन बांधवांना दिशा देणारा हा उत्सव ठरेल.” राजकारणविरहित शिवजयंती साजरी करून एक आदर्श पायंडा पाडल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती आणि बालकलाकारांनी सादर केलेली विविध कलाप्रदर्शने हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक शौर्यकला, सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला हा सुंदर व आकर्षक शिवजयंती उत्सव बीडकरांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

Back to top button