भारताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज- प्रा.डॉ. पांडुरंग सुतार

बीड (प्रतिनिधी):- संकटांवर मात करत संघटनशक्ती वाढवणे, स्त्रीसन्मान राखणे, सुशासन प्रस्थापित करणे हे आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ.पांडुरंग सुतार यांनी केले. अस्मिता प्रतिष्ठान, विठ्ठलाई फॉउंडेशन व आर बी डिजिटल च्या वतीने अस्मिता एजुकेशनल हब येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.बी. डिजिटलचे पदाधिकारी व अस्मिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. संभाजी शिंदे हे होते. तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. पांडुरंग सुतार हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गणेश खाडे आणि अॅड.सतीश वडमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. पांडुरंग सुतार यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी कार्याचा आढावा घेत उपस्थित नागरिकांना त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. शिवाजी महाराजांचे विचार आजच्या समाजासाठी प्रेरणादायी असून एकता, शिस्त आणि देशप्रेम जोपासण्याची गरज असल्याचे सांगितले तसेच शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकत सामाजिक जबाबदारीची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यातून आपण धैर्य, शिस्त, स्वाभिमान आणि न्यायासाठी लढण्याची वृत्ती अंगिकारली पाहिजे. संकटांवर मात करत संघटनशक्ती वाढवणे, स्त्रीसन्मान राखणे, सुशासन प्रस्थापित करणे हे आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या आदर्शांवर चालूनच मजबूत आणि आदर्श राष्ट्र घडू शकते. अध्यक्षीय भाषणात डॉ. संभाजी शिंदे यांनी शिवाजी महाराजांचे सुशासन, स्त्री सन्मान आणि लोकहिताचे धोरण यावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, महाराजांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाज अधिक सक्षम आणि सुसंस्कृत होऊ शकतो. उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री नितीन हातागळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अवचार यांनी केले प्रा.डॉ. पांडुरंग सुतार यांनी वामन दादा कर्डक यांचे ‘शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान’ हे गाणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.



