जामखेड येथे ६ मार्च रोजी: विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

जामखेड येथे ६ मार्च रोजी: विराट हिंदू संमेलनाचे आयोजन
जामखेड | प्रतिनिधी: जामखेड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रबांधणी, सामाजिक समरसता आणि कौटुंबिक मूल्यांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित या ऐतिहासिक महासंमेलनास ह.भ.प. महंत श्री.रामगिरीजी महाराज (श्री गोदावरी धाम, सरला बेट) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून महेशजी करपे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
परिसरातील विविध संत-महंतांची पावन उपस्थितीही या सोहळ्याला लाभणार आहे. या संमेलनातून जात, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीचा भेदभाव न करता सर्वांना आपले मानण्याचा सामाजिक समरसतेचा संदेश दिला जाणार असून कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांना एका विचाराने जोडणारे प्रभावी व्यासपीठ म्हणून हे महासंमेलन ठरणार आहे. कुटुंब हाच समाज आणि राष्ट्राचा पाया आहे हा विचार जनमानसात रुजवण्याबरोबरच पर्यावरण संरक्षण, पाणीबचत, वृक्षारोपण, नागरिक शिस्त, मातृभाषेचा आग्रह, स्वदेशी विचार आणि प्रखर राष्ट्रप्रेम या विषयांवर समाजाला दिशा दिली जाणार आहे. “एक मंदिर, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी” या संकल्पनेतून सामाजिक कार्य हे संघर्षासाठी नसून एकतेसाठी असते, ही भूमिका ठामपणे मांडली जाणार आहे. जामखेडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असल्याचे नमूद करत नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे आणि देशाला परम वैभवाकडे नेण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. रोहिणीताई काशिद (समिती अध्यक्षा) तसेच उपाध्यक्ष मोहन ढाळे,संतोष फिरोदिया,संतोष टेकाळे, संजय टेकाळे यांच्या वतीने करण्यात आले.



