जिद्द आणि चिकाटीने काकडहीरा गावच्या मुलींनी साधली उच्च यशाची शिखरे — राजेंद्र मस्के

कृषी उपसंचालक रेणुका,
पीएसआय रंजना
काकडहिरा गावाचा अभिमान—–
बीड प्रतिनिधी :
आजच्या स्पर्धेच्या युगात करिअर घडवण्यासाठी केवळ उच्च शिक्षण पुरेसे नसून, त्यासोबतच जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम हवे असतात. अशाच जिद्दीने आणि अविरत मेहनतीने काकडहिरा ता.ता बीड येथील रेणुका अशोक बागलाने यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्य स्तरावर 24 वा क्रमांक पटकावत कृषी उपसंचालक पदावर नियुक्ती मिळवून बीड जिल्ह्याचा मान उंचावला आहे. त्याच प्रमाणे काकडहिरा येथीलच रंजना संदिपान बागलाने यांनी एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदावर, तर गळवाडी येथील अनंत मस्के यांनी राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदावर यश संपादन केले आहे.
या तीनही तरुणांनी शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबात जन्म घेऊन ग्रामीण परिस्थितीतील अडचणींवर मात करत प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक परिश्रमाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या घवघवीत कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काकडहिरा येथे आयोजित सत्कार समारंभात त्यांचा गौरव करताना मनोगत व्यक्त केले.
कु रेणुका बागलाने, रंजना बागलाने आणि अनंत मस्के यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. हे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचे नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याचे अभिमानाचे आहे,”
— असे गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी काढले.
या तिघांच्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी काकडहिरा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात काकडहिरा गावातून मिरवणूक काढण्यात आली. महिला व पुरुष ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यशाचा आनंद साजरा केला.
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून उच्च पदावर पोहोचलेल्या या तरुणांची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे — जिद्द, मेहनत आणि सातत्याने प्रयत्न केले तर कोणतेही शिखर गाठता येते, हे त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध केले आहे.



