बीड
भगवानगड व नारायणगडाच्या मठाधिपतींनी दिला एकतेचा संदेश

भगवानगड व नारायणगडाच्या मठाधिपतींनी दिला एकतेचा संदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचे उदघाटन संपन्न
अहिल्यानगर : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे तौरल इंडिया प्रकल्पाचे उदघाटन संपन्न झाले.
तौरल इंडियाचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. स्वतंत्र व आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या वस्तूंची आपल्याला आयात करावी लागते, त्याला सक्षम पर्याय देशातच निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी आता भारतात व विशेषतः महाराष्ट्रात भरत गीते यांच्यासारख्या उद्योजकांमुळे तयार होत आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा समतोल राखण्यावर शासनाचा भर आहे. पूर्वी राज्याची औद्योगिक प्रगती केवळ मुंबई, एमएमआर व पुणे या भागांपुरती मर्यादित होती. ती विकेंद्रित करून राज्याच्या सर्व भागांत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुपा एमआयडीसी हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. केवळ सामंजस्य करार करून न थांबता, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योग विभाग तत्परतेने काम करत आहे. दावोसमध्ये २०२५ मध्ये करण्यात आलेला करार अत्यंत वेगाने प्रत्यक्षात आला आहे.
केवळ उद्योग उभारणे पुरेसे नाही, तर ते पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. या प्रकल्पात ‘सस्टेनेबल कास्टिंग’ व ‘रिसायकलिंग’वर भर देण्यात आला असून, राज्यात ‘उद्योग व पर्यावरण’ हातात हात घालून पुढे जातील, असा विश्वास आहे.
हेलिकॉप्टर, जहाजे आणि रस्ते बांधणीसाठी लागणारे अद्ययावत भाग आता अहिल्यानगरमध्ये तयार होत आहेत, ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे, उद्योग मंत्री श्री उदय सामंत, खासदार भागवत कराड, आमदार काशिनाथ दाते, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम पाचपुते,श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री. नामदेव महाराज शास्त्री, श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प शिवाजी महाराज, तौरल इंडियाचे सीईओ उद्योगपती भरत गिते, थोनी ॲल्युमिनियमचे लोथर थोनी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर, उद्योजक व नागरिक उपस्थित होते.
चौकट :
*भगवानगड व नारायणगडाच्या मठाधिपतींनी कृतीतून दिला संदेश*
सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता सामाजिक एकोपा लयाला गेल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले आहे. यामुळे सामान्य माणूस भ्रमित झालेला आहे. परंतु भ्रमित झालेल्या दोन्ही समाजाला आज भगवानगड व नारायणगडाच्या मठाधिपतींनी एकत्र येण्याचा कृतीतून संदेश दिला आहे. आज तौरल इंडिया प्रकल्पाच्या उदघाटन कार्यक्रमानिमित्त दोन्ही गड एकत्र आल्याने निश्चितच सामाजिक एकता निर्माण होईल अशी चर्चा दोन्ही गडाच्या भक्तांमध्ये सुरु झालेली आहे.



