बीड
प्रा.दत्ता कोंडीबा रामरूले यांना लोकरत्न पुरस्कार प्रदान

प्रा.दत्ता कोंडीबा रामरूले यांना लोकरत्न पुरस्कार प्रदान
प्रतीवर्ष्या प्रमाणे याही वर्षी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांमध्ये लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तथा सोमेश्वर महादेव हनुमान मंदिर फाउंडेशन बीड यांच्या संयुक्त वतीने देण्यात येणाऱ्या लोकरत्न पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. प्रा.दत्ता कोंडीबा रामरूले यांना हा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिनानिमित्त देण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत, लोकशाही पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत वैद्य, प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ शिराळे पाटील, बीड जिल्हा संघटक संजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत व हस्ते नुकतेच करण्यात आले.
प्राध्यापक दत्ता कोंडीबा रामरूले हे सध्या प्रमिला देवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय नेकनूर येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असुन ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असून शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांचे सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातले कार्य विचारात घेत लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने त्यांना हा लोकरत्न पुरस्कार देण्यात आला. प्राध्यापक रामरूले हे आपला व्यवसाय सांभाळून अनेक क्षेत्रांमध्ये कार्य करत आहेत. ज्याचा समाजातील वेगवेगळ्या घटकांना वेळोवेळी फायदा व मदतच झालेली आहे. लोकरत्न पुरस्काराने आपल्याला पुढे कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 2007 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने कुंभार समाज अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष पद भूषवत असताना महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ अंबाजोगाई, संत शिरोमणी सेवाभावी संस्था शेपवाडी व संत गोरोबा काका मंदिर नागझरी संस्थान, नागझरी परिसर शेपवाडी अंबाजोगाई यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम व उपक्रम या काळात केले ज्यामध्ये संत शिरोमणी गोरोबा काकांचे पुण्यतिथी, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, हळदी कुंकू समारंभ अशा अनेक सामाजिक कार्यक्रमांचा समावेश आहे. या पदावर कार्य करत असतानाच तालुका स्तरावर मौजे शेपवाडी येथे सामाजिक सहभागातून व राजकीय पाठपुराव्यामुळे संत शिरोमणी गोरोबा काकाच्या मंदिराची मुहुर्तमेड रोवत आज तेथे सामाजिक सहभाग व आमदार फंडातून जवळपास सात ते आठ लाखाचे बांधकाम कार्य झालेले आहे. आज संत शिरोमणी गोरोबा काका व विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती असलेले मंदिर सन्मानाने उभे असल्याचे दिसून येते. जेथे आज समाजाला दिशा देण्याचे कार्य करण्याच्या हेतूने सांस्कृतिक वारसा जपणारे भजन, किर्तन, लग्न, वाढदिवस ई. सामाजिक व वैयक्तिक कार्य होत आहेत व हीच आपली उपलब्धी असल्याचे व याद्वारे होणारे कार्य हीच सामाजिक ऐक्य व जनसेवा असल्याचेही रामरूले सरांनी सांगितले .याचाच पुढील भाग म्हणून 2014 पासून बीड जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली त्यानंतरही त्यांनी या कामाची श्रंखाला सामाजिक स्तरावर चालूच ठेवली. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या आपत्तीच्या वेळी वैयक्तिक व सामाजिक स्तरावर त्यांनी लोकसभागातून अनेक ठिकाणी सामाजिक व आर्थिक मदत केली. उदाहरणार्थ शेपवाडी येथे गणपती विसर्जनादरम्यान मुर्तमुखी पडलेल्या दोन मुलांच्या कुटुंबीयांना या परिस्थितीतून सावरत असतानाच आर्थिक विवंचनेतून सावरता यावे म्हणून सामाजिक सहभागातून त्यांना आर्थिक मदत करणे, मोरफळी येथील समाज बांधवांच्या एकुलत्या एक पुत्राचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरच्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी सामाजिक सहभागातून दिलेले शिलाई मशीन व लहान मुलांच्या नावावर ठेव तसेच सौलाखे कुटुंबियांना दिलेली शिलाई मशीन, कोविड -19 घ्या काळात सामाजिक स्तरावर वैयक्तिक व लोकसहभागातून केलेले अन्नधान्य किटवाटप, नाथापूर येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नैराशातून आत्महत्या केलेल्या कुटुंबाला लोकसभागातून दिलेले आर्थिक मदत, ओबीसी संघटना अंबाजोगाईतील त्यामाध्यमातून अंबाजोगाईतील ओबीसी पाटी लावा आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनी केले. ओबीसींच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे एक सदस्य म्हणून आयोजन व नियोजन करत घटनात्मक, सामाजिक व शैक्षणिक स्तरावर ओबीसी जनजागृती. ओबीसींच्या मेळाव्यासाठी ओबीसी बांधवांना सोबत घेत त्यांनी हिरीरीने घेतलेला सहभाग व ईतरांना त्यांनी कृतीतून दिलेले प्रोत्साहन या व अशा सर्व कार्यामध्ये सातत्याने पुढाकार घेत वैयक्तिक व सामाजिक स्तरावर कार्यरत असणारे त्याचबरोबर कोल्हापूर येथील पूर परिस्थिती दरम्यान कोल्हापूरकरांना बीड जिल्ह्याच्या वतीने वीस हजार रुपये आर्थिक मदत करने इत्यादी कार्य त्यांनी केले आहे. आर्थिक क्षेत्राचा विचार करता उद्योगपुर्ती निधीच्या माध्यमातून अनेक सामान्य परिस्थितीतील लोकांना त्यांच्या व्यवसाया करता वेगवेगळ्या मार्गाने लोन देत त्यांना व्यवसाय करण्यास कायम प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते पंचक्रोशीत ओळखले जात आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, स्वतःचा विषय निपुणपणे शिकवणारे प्राध्यापक म्हणूनही ते परीचित आहेत. त्यांची विद्यार्थीनी 2014 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून इंग्रजी या विषयात प्रथम आली. त्यांच्या एकूणच शैक्षणिक व संस्थेतील कार्याची दखल घेत ते कार्यरत असणाऱ्या माऊली विद्यापीठ केज संस्थेने त्यांना शैक्षणिक वर्ष 2024-25 चार आदर्श शिक्षक पुरस्कारही दिला आहे. हे त्यांचे यश दर्शविणारी बाब असल्याचे दिसून येते. या पुरस्काराबद्दल त्यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय क्षेत्रातील शुभचिंतक व कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.



