बीड

महावितरणचे ‘पाप’ आले बाहेर! श्रीवर्धन-हरिहरेश्वर रस्त्यावर कुरवडे येथे मृत्यूचा सापळा ​कामात प्रचंड बेजबाबदारपणा; वृत्तपत्रांच्या इशाऱ्याकडे मुजोर प्रशासनाचा कानाडोळा ​वरचेवर खडी-माती टाकून काम दाबण्याचा प्रयत्न पहिल्याच पावसात उघडा!

महावितरणचे ‘पाप’ आले बाहेर! श्रीवर्धन-हरिहरेश्वर रस्त्यावर कुरवडे येथे मृत्यूचा सापळा
​कामात प्रचंड बेजबाबदारपणा; वृत्तपत्रांच्या इशाऱ्याकडे मुजोर प्रशासनाचा कानाडोळा
​वरचेवर खडी-माती टाकून काम दाबण्याचा प्रयत्न पहिल्याच पावसात उघडा!
​श्रीवर्धन (संदेश घोलप):
“श्रीवर्धनमध्ये उच्चदाब लाईन कामात बेजबाबदारपणा; नियमांना तिलांजली, नागरिकांच्या जिवाशी खेळ!” अशा स्पष्ट मथळ्याखाली काही दिवसांपूर्वी अनेक नामांकित वृत्तपत्रांनी या गंभीर समस्येवर सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. कंत्राटदाराने नियम धाब्यावर बसवून अत्यंत कमी खोलीवर या हाय-व्होल्टेज अंडरग्राउंड (भूमिगत) केबल्स टाकल्याचे उघड झाले होते. मात्र, अनेक वृत्तपत्रांमध्ये वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही महावितरणच्या मुजोर प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केल्याचे धक्कादायक वास्तव आता पुन्हा समोर आले आहे.
​दिखाऊ मलमपट्टी पहिल्याच पावसात वाहून गेली!
​प्रसारमाध्यमांनी या अंधाधुंद कारभारावर वारंवार कोरडे ओढल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत. बातम्या आल्यानंतर केवळ दाखवण्यापुरते, महावितरणने या उघड्या पडलेल्या वाहिनीवर वरचेवर खडी आणि माती टाकून काम दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसात ही माती आणि खडी वाहून गेली असून महावितरणचे ‘पाप’ पुन्हा एकदा रस्त्यावर उघडे पडले आहे. कंत्राटदार आणि प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जिवावर उठणारा ठरत आहे.
​रात्रीच्या प्रवासात अपघाताची दाट शक्यता
​सध्या कुरवडे येथील मुख्य रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली असून, महावितरणची ही जीवघेणी अंडरग्राउंड केबल थेट रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडली आहे. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना समोरच्या वाहनाचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर पडल्यास, चालकाने गाडी किंचित जरी बाजूला घेतली, तर थेट या हाय-व्होल्टेज वाहिनीवर गाडी जाऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
​नियमानुसार या केबलच्या वर ‘CAUTION: BURIED ELECTRIC CABLE BELOW’ अशी धोक्याची चेतावणी देणारी पिवळी पट्टी टाकली जाते. मात्र, माती खचल्यामुळे ही विजेची वाहिनी आणि त्यावरील धोक्याची पट्टी आता पूर्णपणे उघड्यावर आल्याने पादचारी, वाहनचालक आणि रस्त्याच्या कडेला चरणाऱ्या गुराढोरांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
​नागरिकांचा संतप्त सवाल: बळी जाण्याची वाट पाहत आहात का?
​वृत्तपत्रांनी दिलेल्या इशाऱ्याकडे कानाडोळा करणाऱ्या या मुजोर प्रशासनाला कधी जाग येणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आता विचारत आहेत. “महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) एखाद्या मोठ्या अपघाताची आणि निष्पाप नागरिकाच्या बळीची वाट पाहत आहे का?” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
​महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कुरवडे येथील या रस्त्याची आणि भूमिगत वाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, येथे कोणताही अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी महावितरण आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Back to top button