बीड
पापनाशी नदीचे पुनरुज्जीवन शाश्वत शेतीसाठी वरदान ठरेल – मयंक गांधी

पापनाशी नदीचे पुनरुज्जीवन शाश्वत शेतीसाठी वरदान ठरेल – मयंक गांधी
आपलं काम आहे समजून लोकसहभाग वाढवा – जेष्ठ सनदी अधिकारी सुधी मोहंती यांचे ग्रामस्थांना आवाहन
नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाचा ग्लोबल विकास ट्रस्ट व सन फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रारंभ
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
पापनाशी नदीचे पुनरुज्जीवन या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण होऊन त्यामध्ये GRA केले जाणार असल्यामुळे करोडो लिटर पाणी जमिनीत साठवले जाईल. हेच पाणी नव्याने फळबाग लागवड करून त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी साधण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी केले तर मध्य प्रदेश सरकारचे माजी सचिव तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी सुधी मोहंती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, शाश्वत शेतीतून शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठीची मयंक गांधी यांना प्रचंड तळमळ असून, ग्लोबल विकास ट्रस्ट ही संस्था ही या भागाला लाभलेले वरदान आहे. संस्थेकडून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये लोकांनी उत्स्फूर्त लोकसहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले. ग्लोबल विकास ट्रस्ट आणि सन फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने पापनाशी नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुक्रवारी भव्य शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते.
अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून वाहणाऱ्या पापनाशी नदीलगत असलेल्या राक्षसवाडी, बोधेगाव, कावळ्याची वाडी, परचुंडी आदी गावांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. या गावांमध्ये शेतीचे नुकसान होण्यासोबतच भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी पापनाशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी ग्लोबल विकास ट्रस्टकडे केली होती.
ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ग्लोबल विकास ट्रस्ट व सन फार्मा यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी रोजी पापनाशी नदीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. चिचखंडी येथून उगम असलेल्या नदीचे 8 किलोमीटर पेक्षा जास्त रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात येणार आहे. याचबरोबर नदीमध्ये GRA म्हणजेच कूपनलिका (बोअर) घेतले जाणार असून त्याद्वारे करोडो लिटर पाणी भूगर्भात मुरविले जाणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी तसेच परळी वैजनाथ तालुक्यातील बोधेगाव व कावळ्याची वाडी येथे या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. या शुभारंभप्रसंगी ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी, मध्यप्रदेश सरकारचे माजी सचिव सुधी मोहंती, डॉ. हरिश्चंद्र वंगे, अंबाजोगाईचे तहसीलदार विकास तरंगे, बालासाहेब दौडतले, बालासाहेब शेप यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंचाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित असलेले संजय भोसले यांनी सदरील कामासाठी स्वयंस्फूर्तपणे 1.5 लक्ष रुपये लोकवाटा दिला तर बिभीषण गडदे, बालासाहेब शेप, बालासाहेब दौडतले, राधाकिशन कुंडगर, रामभाऊ गडदे, लक्ष्मण करणार यांनीही आर्थिक स्वरूपात नदीच्या कामासाठी देणगी दिली. या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे पावसाचे पाणी अडवून भूगर्भात मुरण्यास मदत होणार असून भविष्यातील पूरस्थिती टाळता येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून शेती अधिक शाश्वत होण्यास हातभार लागणार आहे. पापनाशी नदी पुनरुज्जीवन हा परिसरातील जलसुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त करून जलनायक मयंक गांधी यांचे याबद्दल आभार व्यक्त केले.
🔸भविष्यातील संकट टाळण्यासाठी शाश्वत पाऊल – मयंक गांधी
“मराठवाड्याची लढाई ही केवळ पावसासाठी नाही, तर पाणी साठवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी आहे. अतिवृष्टीमुळे वाहून जाणारे पाणी आणि दुष्काळात होणारी पाण्याची टंचाई या दोन्ही समस्यांचे उत्तर नदी पुनरुज्जीवनात आहे. पापनाशी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण हे काम म्हणजे भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी उचललेले ठोस पाऊल आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याचा हक्क सुरक्षित करणे आणि शेतीला शाश्वत बनवणे हेच आमचे ध्येय आहे.” असे प्रतिपादन मयंक गांधी यांनी केले.



