बीड
परळीत तीन गावात त्रेचाळीस गटात दोनशे बासष्ट एकर जमीन तलाठ्यांनी वाढवली

परळीत तीन गावात त्रेचाळीस गटात दोनशे बासष्ट एकर जमीन तलाठ्यांनी वाढवली
— तलाठी आणि मंडळ अधिकारी जेलमध्ये घाला
— ॲड. अजित देशमुख
बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. बोगस पिक विमा, लागत नसताना रेल्वेसाठी अतिरिक्त जमिनीचे संपादन, अशा अनेक घटनानंतर आता परळी तालुक्यातील तीन गावांमध्ये फक्त त्रेचाळीस गटांच्या सातबारा मध्ये अस्तित्वात नसलेल्या जमिनीच्या मालकांची नावे तलाठ्यांनी बोगस रीतीने लावले आहेत. या सातबाराचा आधार घेऊन हे बोगस लोक पीक कर्ज, पिक विमा आणि इतर सर्व लाभ घेत असल्याचे समजते. त्यामुळे सर्व दोषींना जेल मध्ये घालावे, असे जन आंदोलनाचे विश्वस्त तथा स्वराज्य जनजागृती परिषदेचे अध्यक्ष ॲड. अजित देशमुख यांनी म्हंटले आहे.
बीड जिल्हा सातत्याने भ्रष्ट कामात गाजत आहे. त्यात आता नवीन मार्ग निवडत पिक विमा आणि पीक कर्जासाठी ही पळवाट शोधली जात असून बोगस पिक विमा घेणे आणि बोगस कर्ज घेऊन कर्जमाफी मिळवणे, असा उद्योग चालू असल्याची ही तक्रार आहे. प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे तहसीलदार हे सर्व यात सहभागी असल्याचे देखील देशमुख यांनी म्हटले आहे. तक्रार झाल्यानंतर ताबडतोब ही नावे आणि वाढलेली शेती कमी व्हायला पाहिजे. परंतु प्रशासन पातळीवर हे केले जात नाही. चौकशीचा फक्त फार्स दाखवला जातो. यावरून भ्रष्ट प्रशासन जोपर्यंत सुधरत नाही, तोपर्यंत बीड जिल्हा सुधारणार नाही, असेही ॲड. देशमुख यांनी म्हंटले आहे.
परळी तालुक्यातील धर्मापुरी, दैठणा आणि हेळम या तीन गावाची माहिती देशमुख यांना मिळाली आहे. यापैकी धर्मापुरी या गावातील एकूण 1454 गट क्रमांक पैकी 13 गट क्रमांक मध्ये 260 एकर जमीन वाढली आहे. त्याचबरोबर दैठणा घाट या गावात एकूण 498 गट नंबर मधील 16 गट नंबर मध्ये 95 एकर 30 गुंठे जमीन वाढली आहे. आणि हेळम या गावात 787 पैकी 14 गटांमध्ये 93 एकर 94 एकर 47 गुंठे जमीन वाढली आहे म्हणजेच माहिती मिळालेल्या 43 गटांमध्ये 262 एकर जमीन वाढली आहे.
या वाढलेल्या क्षेत्राच्या आधारे किती लोकांनी कोणत्या पिकाचा पिक विमा भरलेला आहे ? त्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला आहे का ? त्याचप्रमाणे यातील किती बोगस नाव वाल्यांनी तलाठ्याशी पीक पेरा संगनमताने पीक कर्ज घेतलेली आहे, हे पीक कर्ज वसूल झाले आहे का ? यांची नावे पीक कर्जमाफीमध्ये आहेत का ? या बाबीची तपासणी आवश्यक आहे. बीड जिल्ह्यातील हा प्रकार तपासल्याशिवाय पिक कर्ज माफी देणे चुकीचे होणार आहे. शेतकऱ्यांना तात्काळ माफी द्या, मात्र बोगस लोकांना माफी न देता तात्काळ कर्ज व्याजासह वसुल करा, असेही ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.
धर्मापुरी येथील कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी रवींद्र मुंडे यांनी ही बाब गेल्या काही महिन्यांपासून तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांना सांगितली आहे. त्यांनी याबाबत विचार तक्रार दाखल करून पोहोच देखील घेतली आहे. मात्र प्रशासन पातळीवर ही तक्रार अजून प्रलंबित असल्याने रवींद्र मुंडे यांनी ॲड. देशमुख यांचे कडे या प्रकरणात मदत मागितली असून शासनाची फसवणूक थांबवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान भ्रष्टाचाराचे सर्व प्रकार शिकायचे असतील तर त्या व्यक्तीने बीड जिल्ह्यात काही दिवस रहायला हवे. बीड जिल्ह्यात प्रशासन देखील किती भ्रष्ट असू शकते याची अनेक नमुने आपण उघडकीस आणले असून हा नवा नमुना आता उघडकीस आणणार असल्याचे ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान या गंभीर प्रकाराची तक्रार ॲड. देशमुख यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कडे दाखल केली आहे. त्याचप्रमाणे शासनाकडे देखील याबाबत तक्रार देण्यात आली आहे. गावागावातील कार्यकर्त्यांनी भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी रवींद्र मुंडे यांच्या प्रमाणे पुढे यावे, असे आवाहन देखील देशमुख यांनी केले आहे
——–


