📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जय महेश शुगरच्या प्रदूषणामुळे खरात आडगाव सह इतर परिसर धोक्यात; MPCBकडे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांची तक्रार

जय महेश शुगरच्या प्रदूषणामुळे खरात आडगाव सह इतर परिसर धोक्यात; MPCBकडे सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ यांची तक्रार

माजलगाव (प्रतिनिधी) :-
माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव परिसरात कार्यरत असलेल्या जय महेश शुगर इंडस्ट्रीज (एन.एस.एल.) लि., पवारवाडी येथून होत असलेल्या गंभीर प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यासह शेती व्यवसाय धोक्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सचिन अण्णासाहेब शेजुळ यांनी दि. ०५/01/2026 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर व पर्यावरण मंत्री यांना तसेच इतर कार्यालयात लेखी तक्रार निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित साखर कारखान्यातून मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूर व काजळी हवेत सोडली जात असून त्याचा थेट परिणाम आसपासच्या शेतातील पिकांवर होत आहे. काजळीमुळे पिकांची वाढ खुंटत असून उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
याशिवाय कारखान्यातून निघणारे घाण पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट कॅनॉल, नाले तसेच गावातील शिवारातील खदानींमध्ये सोडले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होत असून त्याचे विपरीत परिणाम मानवी आरोग्य व जनावरांवर होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे जनावरे गाभण राहत नाहीत तसेच गाभण राहिल्यास व्याहात अडचणी येत आहेत. लहान मुले व तरुणांमध्ये क्षयरोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असून अनेक नागरिकांना डोळ्यांचे विकार व श्वसनाचा त्रास जाणवत आहे.

या सर्व गंभीर बाबी लक्षात घेता, जय महेश शुगर इंडस्ट्रीज कडून होत असलेल्या प्रदूषणावर तात्काळ आळा घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कडक पावले उचलावीत, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते सचिन शेजुळ व परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Back to top button