बीड
…तर तहानलेल्या नागरिकांसाठी रस्त्यावरील संघर्षाची तयारी – राजेभाऊ फड

…तर तहानलेल्या नागरिकांसाठी रस्त्यावरील संघर्षाची तयारी – राजेभाऊ फड
कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; पाणी सोडण्याचे दिले आश्वासन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून, एप्रिल महिना असल्याने सूर्य आग ओकत आहे. अशातच पाण्याची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. त्याचबरोबर पशुपक्षी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले तर त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असल्याने पाणी नदीपात्रात सोडावे ही मागणी गेल्या महिनाभरापासून करण्यात येत आहे. त्यासंदर्भात निवेदने देऊन आणि पत्रव्यवहार करून प्रशासनाला कळवले आहे. येत्या 10 तारखेपर्यंत पाणी सोडले नाही तर 11 एप्रिल रोजी कन्हेरवाडी गावात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याच विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची सोमवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची सोमवारी भेट घेतली. वाढती उष्णता आणि त्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई यासंदर्भात त्यांनी वास्तविकतेवर आधारित चर्चा केली. मागील अनेक दिवसांपासून कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे. या प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले तर त्यामुळे कन्हेरवाडी, जिरेवाडी, जलालपूर, ब्रह्मवाडी, समता नगर, बँक कॉलनी, शंकर पार्वती नगर आदी भागातील पाण्याची टंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन पाणी सोडावे अन्यथा नागरिकांच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी तो करण्याची आपली तयारी असल्याची भूमिका राजेभाऊ फड यांनी मांडली. यावर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी लवकरात लवकर कार्यवाही करू आणि कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश देऊ असे आश्वासन दिले आहे.


