“स्वच्छतेच्या बाबतीत आळंदी मागे का? — पालकमंत्री अजित दादा पवारांनी घ्यावी तातडीने दखल!”

“स्वच्छतेच्या बाबतीत आळंदी मागे का? — पालकमंत्री अजित दादा पवारांनी घ्यावी तातडीने दखल!”
गुटखा, धूर आणि कचऱ्याचा सडा – संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीत प्रशासन झोपले का?
सुहास सावंत / पुणे

संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र भूमीत म्हणजेच आळंदी शहरात आज स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार हे स्वच्छतेबाबत कठोर व पारदर्शक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत; मात्र त्यांच्या कार्यक्षेत्रातील आळंदी नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्या स्वच्छता मोहिमेची पायमल्लीच केल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि गुटखा सेवन बेधडक सुरू आहे. भिंती, कोपरे लाल पिचकाऱ्यांनी विद्रूप झाले आहेत. ‘धूम्रपान बंदी’ हा फक्त फलकापुरता राहिला आहे, असे नागरिक संतप्त स्वरात सांगतात.

त्यातच बायपास रोडवरील कचऱ्याचे ढिगारे आळंदीच्या सौंदर्यावर काळे ढग आणत आहेत. या कचरा मुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास शाळकरी मुलांना, प्रवाशांना आणि नागरिकांना प्रचंड प्रमाणात होत आहे.
“आळंदी ही संतांची नगरी असून, तीर्थयात्रींच्या भावनांचा केंद्रबिंदू आहे. मात्र नगरपरिषदेकडून या शहराचा अपमानच होत आहे,” अशी खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी अनेकदा ‘स्वच्छता अभियान’, ‘धूम्रपानमुक्त शहर’ उपक्रम राबवण्याचे आदेश दिले असतानाही, आळंदी नगरपरिषदेने त्या आदेशांकडे सरळ दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे मत आहे.
“घराची कळा अंगण सांगते, तसेच आळंदी नगरपरिषदेचे कोपरे सांगतात की प्रशासन झोपले आहे,” असे संतप्त नागरिकांनी म्हटले आहे.
आळंदीतील ही परिस्थिती पाहता पालकमंत्री अजित दादा पवार यांनी यावर तातडीने लक्ष घालावे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सूचना देऊन स्वच्छता मोहिमेला नवा वेग द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पुणे जिल्ह्यात स्वच्छतेसाठी अजित दादा पवार यांची ओळख “कठोर आणि निर्णयक्षम” अशी आहे. त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यातील पवित्र आळंदी शहरात खुद नगरपरिषद कार्यालयात गुटख्याच्या पिचकाऱ्या आणि कचऱ्याचे डोंगर दिसणे, ही नक्कीच प्रशासनाची लाजिरवाणी बाब ठरते.
नागरिकांचा एकमुखी सूर:
“पालकमंत्री अजित दादा पवार साहेबांनी स्वतः हस्तक्षेप करून आळंदी नगरपरिषदेला जाग आणावी – अन्यथा ही संतांची नगरी ‘अस्वच्छतेच्या काळोखात’ बुडेल.”

