📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आगार प्रमुख डोके यांच्या त्रासामुळे मागासवर्गीय एसटी महिला कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात: कार्यालयातच पडल्या बेशुद्ध

आगार प्रमुख डोके यांच्या त्रासामुळे मागासवर्गीय एसटी महिला कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात: कार्यालयातच पडल्या बेशुद्ध
बीड प्रतिनिधी : बीड मध्यवर्ती बसस्थानकात घडलेली धक्कादायक घटना—मागासवर्गीय समाजातील एसटी महिला कर्मचारी स्वाती कांबळे यांचा जीव कार्यालयीन त्रासामुळे थोडक्यात वाचला. पदोन्नती मिळून तीन महिने उलटून गेले तरी चार्ज न देणे, सततची टाळाटाळ, त्यावर जातीवाचक अपमानास्पद शब्दप्रयोग या सर्वामुळे अखेर कांबळे कार्यालयातच बेशुद्ध पडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती कांबळे या तीन महिन्यांपूर्वी वाहक पदावरून लिपिक पदावर पदोन्नत झाल्या. मात्र आजतागायत त्यांना अधिकृत चार्ज देण्यात आलेला नाही. त्या रोज डेपो कार्यालयात हजेरी लावत होत्या, चार्जसाठी मागणी करत होत्या, पण वरिष्ठांकडून दुर्लक्षच होत होते. सततच्या अन्यायामुळे त्यांचा मानसिक ताण वाढत गेला आणि त्यामुळे रक्तदाबाचाही त्रास वाढला.
23 ऑगस्ट रोजी त्या कार्यालयात गेल्यावर आगार प्रमुख डोके व इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना जातीवाचक अपशब्द बोलत अपमानित केल्याचा आरोप आहे. यामुळे झालेल्या धक्क्याने स्वाती कांबळे यांचा बीपी लो होऊन त्या कार्यालयातच कोसळल्या. धक्कादायक बाब म्हणजे, त्या बेशुद्ध पडल्या असताना कार्यालयातील एकाही अधिकाऱ्याने वा कर्मचाऱ्याने मदत केली नाही. नंतर काही स्थानिकांनी पुढाकार घेत त्यांना तातडीने सरकारी दवाखान्यात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणामुळे संपूर्ण एसटी विभागात संतापाची लाट उसळली आहे. आगार प्रमुख डोके यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती–जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी कायदा) गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट – एस.टी. महामंडळातील जातीयवादाचा कळस!
एस.टी. महामंडळामध्ये महिला कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी दिली जात नसते, मात्र आगार प्रमुख यांच्या जातीयवादी मानसिकतेमुळे वंदना पंडित या मागासवर्गीय महिला कर्मचाऱ्यास जबरदस्तीने नाईट ड्युटी देण्यात आली. या प्रकारातून त्यांना जाणीवपूर्वक जातीय दृष्टिकोनातून त्रास दिला गेला.
याचप्रमाणे श्वेता कांबळे या मागासवर्गीय महिला कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेनुसार विभागीय कार्यालयामध्ये पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना कसल्याही प्रकारचा पदभार न देता मानसिक छळ करण्यात आला. चौकशीसाठी त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे गेल्या असता त्यांनाही जातीयवादी अपशब्दांचा सामना करावा लागला, परिणामी त्या कार्यालयातच बेशुद्ध पडल्या.
ही घटना अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी असून, संबंधित अधिकाऱ्यांवर अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही ठामपणे पाठपुरावा करत राहणार आहोत.
Back to top button