बीड

वैद्यनाथ बँकेची निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढवणार

वैद्यनाथ बँकेची निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढवणार
बाबासाहेब शिंदे, ॲड.प्रकाश मुंडे, भोजराज पालीवाल, कॉ.पांडुरंग राठोड यांचे स्पष्टीकरण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-मराठवाड्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या वैद्यनाथ अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सहकार खात्याकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल की काय? अशी आशंका सभासद मतदारांमध्ये होती. मात्र महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांची या निवडणुकीच्या संदर्भात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, वैद्यनाथ बँकेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते कॉ.पांडुरंग राठोड यांनी केली आहे.
वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने नवीन संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. सोमवारपासून या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सभासदांच्या हितासाठी, उद्धारासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पॅनल पूर्ण ताकदीने उभा राहणार असल्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. परळी वैजनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात यासंदर्भात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख भोजराज पालीवाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते कॉ.पांडुरंग राठोड यांच्या वतीने करण्यात आली. या बैठकीस ज्येष्ठ नेते नारायणराव सातपुते, कॉ. पि.एस.घाडगे, बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड, शहराध्यक्ष ॲड.जीवनराव देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश विभुते, माधवराव मुंडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
*इच्छुकांना महाविकास आघाडीच्या पॅनलकडून संधी मिळणार*
वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने उतरणार असून, सभासद मतदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या सभासद मतदारांना भाग घेता येणार आहे. इच्छुकांना महाविकास आघाडीच्या पॅनलकडून निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मध्यवर्ती संपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे किंवा 9764477777, 7083137137 या क्रमांकावर तत्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Back to top button