उपवर्गीकरणाच्या लढ्याला मिळाले जनआंदोलनाचे स्वरूप; १६ जून रोजी लाखोंच्या उपस्थितीत ‘मातंग क्रांती मोर्चा’ची घोषणा

उपवर्गीकरणासाठी मातंग समाज एकवटला; बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक बैठकीत एकजुटीचा निर्धार
चौकट
समस्त मातंग समाज बांधवांना जाहीर आवाहन
उपवर्गीकरण हा आपल्या न्याय्य हक्कांचा, सामाजिक न्यायाचा आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा लढा आहे. हा संघर्ष कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून संपूर्ण मातंग समाजाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे.
यासाठी येत्या दि. १६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक “मातंग क्रांती मोर्चा”मध्ये प्रत्येक समाज बांधव, युवक, महिला, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या एकजुटीची ताकद दाखवावी.
बीड, दि. ५ जून – अ, ब, क, ड उपवर्गीकरण समितीच्या वतीने आज बीड शहरातील विश्वदत्त लॉन्स येथे जिल्हास्तरीय बैठकीचे भव्य आयोजन करण्यात आले. या बैठकीस बीड जिल्ह्यातील विविध भागांतून समाजातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी वर्ग, युवक, महिला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या उपवर्गीकरणाच्या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात समाजातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी स्मृतीशेष एकनाथरावजी आव्हाड साहेब व बौद्धवासी आत्मारामजी चांदणे साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील सर्व घटकांच्या सूचना, अपेक्षा व मार्गदर्शन जाणून घेणे हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपवर्गीकरण हा केवळ सामाजिक प्रश्न नसून मातंग समाजाच्या अस्तित्व, न्याय्य प्रतिनिधित्व, शैक्षणिक प्रगती व सामाजिक न्यायाचा प्रश्न असल्याचे मत व्यक्त केले. समाजाला त्याचा घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी सुरू असलेला लढा अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून अ, ब, क, ड उपवर्गीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी फिरून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. उपवर्गीकरणाचे महत्त्व, त्याची आवश्यकता आणि समाजाच्या विकासातील भूमिका याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या कार्याबद्दल उपस्थितांनी समितीचे विशेष अभिनंदन करत, “संपूर्ण मातंग समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे येत्या दि. १६ जून २०२६ रोजी भव्य ‘मातंग क्रांती मोर्चा’ काढण्याची घोषणा होय. लाखो समाजबांधवांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार असून या आंदोलनाला अधिकृतपणे “मातंग क्रांती मोर्चा” असे नाव देण्यात आले. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात निर्णयाचे स्वागत केले.
उपस्थित प्रमुख नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मातंग समाजात निर्माण झालेली जागृती व क्रांती आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. उपवर्गीकरण हा समाजाचा न्याय्य हक्क असून तो मिळविण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल. येत्या काळात आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि समाजघटकापर्यंत हा लढा पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत आंदोलनासाठी आवश्यक आर्थिक मदत तसेच मोर्चासाठी लागणाऱ्या विविध सुविधांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. समाजहितासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्यांनी समितीच्या कार्याला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी समाजातील महापुरुषांविषयी अलीकडच्या काळात होत असलेल्या बदनामकारक व आक्षेपार्ह पोस्ट्सबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महापुरुषांचा अवमान यापुढे कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही व अशा प्रवृत्तींना संविधानिक व कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत घेण्यात आली.
बैठकीदरम्यान उपस्थितांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उपवर्गीकरणाच्या लढ्याला पूर्ण ताकदीने साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात हा लढा अधिक व्यापक, संघटित व प्रभावी स्वरूपात उभारण्यात येणार असल्याची ग्वाही देत बैठकीचा समारोप करण्यात आला.
—



