बीड

अन्यायाला न घाबरता तक्रार करा ; रोहित पवारांचा विद्यार्थ्यांना संदेश

अन्यायाला न घाबरता तक्रार करा ; रोहित पवारांचा विद्यार्थ्यांना संदेश

जामखेड वसतीगृहातील मारहाणीच्या प्रकारावर ; आमदार रोहित पवार यांची कठोर प्रतिक्रिया

जामखेड प्रतिनिधी – जामखेडमधील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात नववीतील विद्यार्थ्यांनी आठवीतील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गंभीर घटनेची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

“ही घटना अत्यंत गंभीर असून संबंधितांशी बोलणं झालं आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात येणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्याचे आणि वसतीगृहात शिक्षणासाठी पाठवलेले विद्यार्थी मारामाऱ्या तर करत नाही ना, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

“अन्याय सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही न घाबरता तक्रार देण्याची हिंमत दाखवावी, जेणेकरून अशा प्रकारांना वेळेत आळा घालता येईल,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

Back to top button