बीड

साहित्यिक बाळासाहेब शिंदे यांना समाज भूषण तर श्वेता गायकवाड यांना मूकनायक पुरस्कार प्रदान

साहित्यिक बाळासाहेब शिंदे यांना समाज भूषण तर श्वेता गायकवाड यांना मूकनायक पुरस्कार प्रदान

जामखेड:- तालुक्यातील मौजे सातेफळ या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त रमाई युवा मंचच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात सन 2025 -26 चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार खर्डा येथील पत्रकार व साहित्यिक बाळासाहेब शिंदे यांना देण्यात आला असून पत्रकारितेतील मूकनायक हा पुरस्कार साप्ताहिक पोलीस वॉरंट चे संपादिका श्वेता गायकवाड यांना देण्यात आला आहे. तसेच कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी म्हणून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झांजाड यांनाही आदर्श सेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. या तिघांनाही रमाई युवा मंच तर्फे ट्रॉफी, शाल, श्रीफळ, देऊन त्यांना बौद्धाचार्य व साहित्यिक गोकुळ गायकवाड, तुरुंग अधिकारी अंकुश सदाफुले, गुलाब सदाफुले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.
पत्रकार व साहित्यिक बाळासाहेब शिंदे हे गेली २० वर्षापासून शाहू, फुले, आंबेडकर, विचारावर जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी सार्वजनिक जयंती उत्सव व इतर कार्यक्रमात सामाजिक प्रबोधनाचे उल्लेखनीय असे कार्य करत आलेले आहेत. तसेच कथा कादंबरी लेखन कविता लेखन व उत्कृष्ट सूत्रसंचालन असा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कामाची पावती रमाई युवा मंच कार्यकर्त्यांनी दिनांक १६ एप्रिल रोजी हा पुरस्कार देऊन सिद्ध केले. तसेच कैलासवासी बापूसाहेब गायकवाड यांच्या कन्या श्वेता गायकवाड यांनी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेले पोलीस वॉरंट या साप्ताहिकाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या निर्भीड लेखणीने या साप्ताहिकातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झांजाड यांनी ही दोन वर्षातच खर्डा येथे चांगली कामगिरी करून गुन्हेगारीला आळा घातला आहे. तसेच सातेफळ येथील जयंती सोहळ्यामध्ये इतरही अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले असून हा जयंती उत्सव प्रबोधन व वैचारिक विचाराची जयंती असल्याचे मत साहित्य गोकुळ गायकवाड यांनी व्यक्त केले होते. या कार्यक्रमासाठी रमाई युवा मंच चे सर्व भीमसैनिक,पत्रकार संतोष थोरात,श्वेता गायकवाड,बाळासाहेब शिंदे, धनशिंग साळुंखे, डॉक्टर पाचरणे,ग्रामसेवक युवराज ढेरे, सरपंच गणेश लटके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच सेवा निवृत्त तुरुंग अधिकारी अंकुश सदाफुले, गुलाब सदाफुले, पोलीस कॉन्स्टेबल नवी मुंबईचे संदीप सदाफुले,सरपंच गणेश लटके, कार्यक्रमाचे आयोजक ग्राम पंचायत सदस्य काशिनाथ सदाफुले, बबन सदाफुले, अजित सदाफुले,अशोक सदाफुले, निळकंठ सदाफुले, वामन सदाफुले, शाहू सदाफुले, व सर्व भीमसैनिकांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने ही जयंती वैचारिक व प्रेरणादायी जयंती ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाचर्णे यांनी केले. या जयंती सोहळ्यात लहान मुलांनीही उत्कृष्ट भाषण करून सभा जिंकली.
दिनांक १७ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी भीमसैनिक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक सातेफळ गावातून काढण्यात आली.

Back to top button