बीड

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: १९ चोरीच्या मोटरसायकली जप्त, २ आरोपी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: १९ चोरीच्या मोटरसायकली जप्त, २ आरोपी गजाआड
*दै,सूर्योदय*:-भंडारा:-भंडारा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरी प्रकरणातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल १९ चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून, दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरांना मोठा धक्का बसला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक १२ जुलै रोजी जिल्ह्यातील चोरीच्या गुन्हेगारांची माहिती तपासत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, अड्याळ येथील श्रीनगर गावात राहणाऱ्या कृष्णा उर्फ सोनू उके याच्या घरी चोरीच्या मोटरसायकली ठेवल्या आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड आणि त्यांच्या पथकाने सोनू उकेच्या घरी छापा टाकला.
सोनू उकेकडून १० मोटरसायकली जप्त
सोनू उकेच्या घरातून १० मोटरसायकली मिळून आल्या. याबाबत कागदपत्रे मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर सोनू उकेने आपला साथीदार नितीन उर्फ गुंडा खोब्रागडे आणि फरार आरोपी प्रवीण कंगले (दोघे रा. वाकनेश्वर, भंडारा) यांच्यासोबत जुनी मौदी गणेश नगरी दाभा, तिरी शिवारा, पाहेला, सामान्य रुग्णालय भंडारा, भावड अडेगाव, पचखेडी (नागपूर ग्रामीण) येथून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.
नितीन खोब्रागडेकडून ९ मोटरसायकली हस्तगत
सोनू उकेच्या कबुलीजबाबानंतर पथकाने नितीन उर्फ गुंडा खोब्रागडे याच्या वाकनेश्वर येथील घरी छापा टाकला असता, तेथे टिनच्या शेडमध्ये आणखी ९ चोरीच्या मोटरसायकली आढळल्या. नितीननेही या मोटरसायकलींबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. या ९ मोटरसायकली त्याने कृष्णा उर्फ सोनू खोब्रागडे आणि प्रवीण कंगले यांच्यासोबत सामान्य रुग्णालय भंडारा, सचिन हॉल बेला (भंडारा), शहापूर, पाहुणी/खात, मल्टी स्पेशालिस्ट दवाखाना लाखनी, स्टेट बँक लाखनी येथून चोरल्याचे कबूल केले.
एकूण १९ मोटरसायकली जप्त, ४.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जप्त केलेल्या सर्व मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथे आणून ‘वाहन पोर्टल’वरून त्यांच्या मूळ मालकांची माहिती तपासण्यात आली. यातील १७ मोटरसायकली विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्हे (कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता आणि ३७९ भादवी) संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. दोन मोटरसायकलींच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे. आरोपी कृष्णा उर्फ सोनू उके आणि नितीन उर्फ गुंडा खोब्रागडे यांच्या ताब्यातून एकूण १९ चोरीच्या मोटरसायकली, ज्यांची एकूण किंमत ४,२०,००० रुपये आहे, जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  नुरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक  निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, स.पो.नि. केशव पुंजरवाड, पो.हवा. नितीन महाजन, राजेश पंत्रुचे, संदीप मते, प्रफुल कठाणे, पो.ना. अंकुश गाढवे, नरेंद्र लाखडे, पो.शि. योगेश येते, जगदीश श्रवणकर आणि चा.पो.शि. कौशीक गजभिये यांनी केली. या कारवाईमुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली आहे.
Back to top button