आळंदी नगरपरिषदेत सुजाता कालिदास तापकीर बिनविरोध उपनगराध्यक्ष; संदीप रासकर व राहुल चितळकर स्वीकृत नगरसेवक

आळंदी नगरपरिषदेत सुजाता कालिदास तापकीर बिनविरोध उपनगराध्यक्ष; संदीप रासकर व राहुल चितळकर स्वीकृत नगरसेवक
नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण
सुहास सावंत / आळंदी
आळंदी नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांची निवड प्रक्रिया शांततेत व बिनविरोध पार पडली. यामध्ये सौ. सुजाता कालिदास तापकीर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली, तर संदीप मारुती रासकर व राहुल कृष्णा पाटील चितळकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी दहा ते बारा या वेळेत सौ. सुजाता कालिदास तापकीर यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांच्याकडे दाखल केला होता. पिठासीन अधिकाऱ्यांनी सदर अर्जाची छाननी करून तो वैध ठरवला. उपनगराध्यक्ष पदासाठी कोणताही विरोधी अर्ज दाखल न झाल्याने पावणे एक वाजता सौ. सुजाता कालिदास तापकीर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी छाननी अधिकारी श्री. विठ्ठल जोशी, उपविभागीय अधिकारी पुणे यांच्याकडे बैठकीच्या २४ तास अगोदर, म्हणजेच दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. गटनेते श्री. सचिन गिलबिले यांच्या शिफारशीने राहुल कृष्णा पाटील चितळकर, संदीप मारुती रासकर व तुषार अरुण घुंडरे यांचे नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले होते.
छाननी प्रक्रियेदरम्यान तुषार अरुण घुंडरे यांना अशासकीय संस्थेतील आवश्यक पाच वर्षांचा अनुभव नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला. उर्वरित दोन अर्ज संदीप मारुती रासकर व राहुल कृष्णा पाटील चितळकर यांचे पात्र ठरवून ते पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष श्री. प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी नगरपरिषद यांच्याकडे पाठवण्यात आले.
यानंतर दुपारी एक वाजता नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी श्री. प्रशांत कुऱ्हाडे यांनी संदीप रासकर व राहुल चितळकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत घोषणा केली. सदर निवडीसाठी आयोजित सभेस सर्व नगरसेवक उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष सौ. सुजाता कालिदास तापकीर तसेच नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक यांचे अभिनंदन करण्यात आले. नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत ‘बुक ऐवजी बुक’ या संकल्पनेअंतर्गत पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देऊन मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांनी केले.
या निवडीमुळे आळंदी नगरपरिषदेतील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



