बीड
लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात? म्हसळ्यात पत्रकार जितेंद्र नटे यांच्यावर गुन्हा दाखल

लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात? म्हसळ्यात पत्रकार जितेंद्र नटे यांच्यावर गुन्हा दाखल
प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवल्याचा राग? राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
म्हसळा (संदेश घोलप) तालुक्यातील प्रलंबित नागरी प्रश्न आणि प्रशासकीय कारभारावर सातत्याने परखड भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र नटे यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकारितेच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
प्रकरण नेमके काय? मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या काही छायाचित्रां संदर्भात जितेंद्र नटे यांनी सामाजिक दृष्टिकोनातून काही सूचना केल्या होत्या. या सूचनांचा आधार घेत महेश घोले यांनी नटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी नटे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून नटे यांना लेखनावर काही निर्बंध घालण्यात आल्याचे समजते.
पोलिसांसमोरच धमकावल्याचा आरोप
जितेंद्र नटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू असतानाच तक्रारदाराने त्यांना पोलिसांच्या समक्ष अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले असण्याची शक्यता असूनही, पोलिसांनी तक्रारदारावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा दावा नटे यांनी केला आहे.जितेंद्र नटे हे गेल्या अनेक वर्षांपासून श्रीवर्धन मतदार संघातील स्थलांतर, रखडलेली एमआयडीसी (MIDC), माणगाव लोकल ट्रेनची मागणी आणि रस्ते कामांमधील कथित अनियमितता यांवर ‘रायगड मत’ व सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. प्रशासकीय सिस्टिममधील त्रुटींवर बोट ठेवल्यामुळेच त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
“चोर सोडून संन्याशाला फाशी” असा हा प्रकार असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे. वास्तविक, आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, त्याबद्दल सतर्क करणाऱ्या पत्रकारावरच गुन्हे दाखल होणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याची चिन्हे असून, पत्रकार संघटना याकडे कशा प्रकारे पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



