बीड
उत्तर प्रदेशातील बसपाच्या सत्तेत महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान आहे – ॲड. सुनिल डोंगरे

उत्तर प्रदेशातील बसपाच्या सत्तेत महाराष्ट्राचे
महत्वाचे योगदान आहे – ॲड. सुनिल डोंगरे
नांदेड (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या सत्तेत महाराष्ट्राचे महत्वाचे योगदान नेहमीच राहिले असून २०२७ मध्ये बहन मायावतीजी पाचव्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनणार असल्याची चांगली परिस्थिती निर्माण होत असून त्यात पुन्हा एकदा आपले दातृत्व दाखवून योगदान द्यावे असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनिल डोंगरे यांनी केले.
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांचा जन्मदिवस, १५ जानेवारी हा “आर्थिक सहयोग व जनकल्याणकारी दिवस” म्हणून पूर्ण देश हर्षोल्हासाने साजरा करत असतो. याचाच एक भाग म्हणून बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲड. सुनिलजी डोंगरे यांनी नांदेड येथे बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कु. मायावतीजी यांच्या जन्म दिनानिमित्त नांदेड जिल्हा संघटन समीक्षा बैठक घेतली.
या बैठकीला मार्गदर्शन करत असताना प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनीलजी डोंगरे साहेब पुढे म्हणाले की, २०२७ ला उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकीत परम आदरणीय बहन कु. मायावतीजी यांना पाचव्यांदा मुख्यमंत्री बनविण्यासाठी तेथील सर्व बहुजन समाज मोठ्या ताकतीने कामाला लागलेला आहे. मात्र निवडणुका म्हणजे आर्थिक भार असतो आणि हा भार कोणत्याही एका प्रदेशच्या कार्यकर्त्यावर टाकणं योग्य नाही. नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचाही हातभार लागावा म्हणून महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आर्थिक सहयोग देऊन व बुथ संघटन बांधणी करून पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तन मन धन लाऊन महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करावे.
महाराष्ट्राचे महासचिव मुकुंद सोनवणे (छ. संभाजीनगर) यांनीही यावेळी विषयानुरूप मार्गदर्शन केले. राज्याच्या अध्यक्षांचा प्रतिनिधी हा जिल्हाध्यक्ष असतो, बाकीचे पदाधिकारी हे जिल्हाध्यक्षांना पूरक असतात म्हणून जिल्हाध्यक्षांना डावलून निवड व नियुक्त्या कुणालाही करता येणार नाहित. त्यांच्या परवानगी व सहमतीने जिल्ह्यातील सर्व बैठक, शिबिरे व अन्य कार्यक्रम झाले पाहिजेत. पक्ष कुणा एकाच्या दावणीला बांधला जाणार नाही असे परखड विचार मुकूंद सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनीही आपली भूमिका सविस्तर मांडली. बामसेफचे मराठवाडा झोन प्रभारी मिलिंद बनसोडे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. नांदेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोकरे यांनी जिल्ह्याचा अहवाल सादर केला. बहन मायावतीजी यांच्या वाढदिवस निधीचा पहिल्या टप्प्यातील निधी प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला.
जिल्हा प्रभारी शिवाजी सोनटक्के यांनी या बैठकीचे सूत्रसंचलन केले तर शेवटी महानगर अध्यक्ष अनिकेत आळंदीकर यांनी आभार प्रदर्शन केले. जिल्हा प्रभारी जयवंत थोरात, सटवा सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल कोठेवाड, जिल्हा कोषाध्यक्ष सखाराम मामा इंगोले, महिला जिल्हाध्यक्षा मायाताई पाटील, हदगावचे विधानसभा प्रभारी प्रा. विजयकुमार भरणे, नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष नागसेन खंदारे, महासचिव आनंदा खंदारे, प्रभारी रमेश लोणे, सतीश पाटील, लोहा कंधार विधानसभा अध्यक्ष साईनाथ निळकंठे, नायगाव विधानसभा अध्यक्ष नागोराव ढवळे, प्रभारी अविनाश इटकापल्ले, नांदेड महानगर कोषाध्यक्ष नारायण घुले, तसेच भीमराव जाधव, ॲड. जे. पी. सोमवंशी, जितेंद्र गोणारकर, गंगाधर सर्पे (किनवट) ई. बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



