पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे ६ मे रोजी मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे
६ मे रोजी मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक
जामखेड प्रतिनिधी:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त, त्यांच्या जन्मगाव चौंडी येथे येत्या ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक बैठक होणार आहे. या बैठकीसाठी ४१ मंत्र्यांचा प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला असून, तयारीला युद्धपातळीवर वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
प्रा. शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच अशी मोठी बैठक एका छोट्या गावात होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांचा विचारसंपन्न वारसा आजचे सरकार पुढे नेत आहे. त्यामुळे या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.”
या बैठकीत येत्या ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या नियोजनावरही चर्चा होणार असून, मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
राज्य शासनासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सुरक्षेपासून वाहतुकीपर्यंत सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



