सहा वर्षांच्या चिमुकली माईरा सय्यदचा पहिला रोजा पुर्ण

सहा वर्षांच्या चिमुकली माईरा सय्यदचा पहिला रोजा पुर्ण
जामखेड – रमजान महिना हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लीम बांधव एक महिन्याचे निरंकार उपवास करतात .
इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना 19 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून जगभरातील मुस्लिम बांधव या महिन्यात आत्मशुद्धी, संयम आणि भक्तीचा संदेश देत आहेत. नमाज, रोजा आणि जकात यांचे काटेकोर पालन करत हा महिना अध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित केला जातो. या पवित्र वातावरणात जामखेड शहरात एक प्रेरणादायी प्रसंग घडला आहे.
जामखेड येथील सय्यद मोहसिन रशीद यांची कन्या माईरा मोहसिन सय्यद हिने अवघ्या सहाव्या वर्षी आपला पहिला रोजा पूर्ण करून भक्ती आणि संस्कारांचा सुंदर आदर्श घालून दिला. एवढ्या लहान वयात दाखवलेली जिद्द आणि श्रद्धा पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनीही तिचे कौतुक केले.
रमजान हा इस्लामिक कालगणनेतील नववा महिना असून या महिन्यात कुराण शरीफ अवतरल्याची मान्यता आहे. रोजा म्हणजे केवळ अन्न-पाणी त्याग नव्हे, तर वाईट विचारांपासून दूर राहून संयम, करुणा आणि आत्मपरीक्षणाचा मार्ग स्वीकारणे होय. गरीब व गरजूंची मदत करण्यासाठी जकात देणे ही देखील या महिन्याची महत्त्वाची शिकवण आहे. लहान मुलांना रोजा आणि त्यामागील संस्कार समजावून देण्यासाठी अनेक कुटुंबांमध्ये पहिला रोजा विशेष उत्साहात साजरा केला जातो.
दिनांक 22 फेब्रुवारी रोजी कडक उन्हाची चाहूल असतानाही माईराने कोणतीही तक्रार न करता उत्साहाने आपला पहिला रोजा पूर्ण केला. इतक्या लहान वयात तिने दाखवलेली चिकाटी आणि भक्ती पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. संध्याकाळी रोजा सोडण्याच्या (इफ्तार) वेळी कुटुंबीयांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध फळे, स्वादिष्ट पक्वान्न आणि आनंदमय वातावरणात माईराचा फुलांच्या माळांनी सत्कार करण्यात आला. एवढ्या लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल सय्यद कुटुंबाचे सर्वत्र अभिनंदन होत असून उपस्थित मान्यवरांनी माईराच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



