बीड
जिनिंग व सोयाबीन खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची लूट थांबवा

जिनिंग व सोयाबीन खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची लूट थांबवा
शेतकरी हक्क मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांना बेमुदत आंदोलनाचा इशारा
बीड (प्रतिनिधी):( दि.०९ )बीड जिल्ह्यात कापूस व सोयाबीन खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक व लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांच्या कापसाला जाणीवपूर्वक कमी प्रतवारी (ग्रेडिंग) देऊन हमीभावापेक्षा कमी दर दिला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
तसेच जिल्ह्यातील अनेक सोयाबीन खरेदी केंद्रांवर प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत पाठवले जात असून अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. हा प्रकार सीसीआयमार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय कापूस खरेदी केंद्रे व सोयाबीन खरेदी केंद्रांवर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांची होणारी लूट व हेळसांड तात्काळ थांबवावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून सीसीआय अंतर्गत चालणाऱ्या जिनिंग व सोयाबीन खरेदी केंद्रांवरील गैरप्रकार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकरी पुत्रांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोकराव येडे, डॉ. गणेश ढवळे, कुलदीप करपे, गणेश नाईकवाडे, सुहास जायभाय, राजू गायके, प्राचार्य राजकुमार कदम, डी. जी. तांदळे, रामधन जमाले, ज्योतीराम हरकुडे, बाळासाहेब मोरे, अर्जुन सोनवणे, राज वीर, लहू गायकवाड पाटील, बाजीराव ढाकणे, सुदाम तांदळे आदी उपस्थित होते.



