संपादकीय
मिल्लिया महाविद्यालयाचे कामखेडा येथे आरोग्य तपासणी शिबिर

मिल्लिया महाविद्यालयाचे कामखेडा येथे आरोग्य तपासणी शिबिर
बीड: येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत सुरु असलेल्या मौजे कामखेडा ता. जि. बीड येथील विशेष शिबिरामध्ये दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्दिष्ट अॅनिमिया विषयी जागरूकता निर्माण करणे, त्याची लक्षणे व प्रतिबंध याबाबत माहिती देणे तसेच सहभागींची तात्काळ तपासणी व सल्ला देणे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मौजे कामखेडाचे सरपंच श्री. बिलाल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री. बिलाल पटेल यांनी अॅनिमियाचा आरोग्यावर होणारा परिणाम, विशेषतः महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलां-मुलींमध्ये मध्ये, यावर प्रकाश टाकला. तसेच गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे सांगितले. हे शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र साक्षाळपिंप्री च्या सहकार्याने आयोजित केले होते. श्री. रिझवान बेग (आरोग्य सेवक), श्रीमती कुलाल एल. डी. (आरोग्य सेविका), श्री. सातपुते के. एस. (आरोग्य सेवक), श्रीमती वीर एम. एस. (आरोग्य सेविका) आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची टीम शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करत होती. या शिबिरात १०८ जणांची तपासणी करण्यात आली. प्रत्येक व्यक्तीची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली व ज्यांना कमी स्तर आढळले त्यांना आहारातील बदल आणि जीवनशैली सुधारण्याबाबत वैयक्तिक सल्ला देण्यात आला. तसेच गरजूंना मोफत लोह व फॉलिक ऍसिड सप्लिमेंट्स देण्यात आले.
शिबिरात संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासण्या, स्वच्छता या विषयांवरही भर देण्यात आला. शासनाच्या आरोग्याबाबत विविध योजना कशाप्रकारे राबविल्या जातात याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शिबिराच्या व्यवस्थापनात, सहभागींच्या समन्वयात आणि योग्य मार्गदर्शनात महत्त्वाची भूमिका बजावली. या शिबिराने समाजाच्या आरोग्यासाठी मोठे योगदान मिळाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मिर्झा असद बेग यांनी तर आभार डॉ. शेख रफीक यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.



