सन्मान नारीशक्तीचा ‘स्त्रीरत्न’ पुरस्काराने डॉ.संगीता गोविंद मेण यांचा गौरव

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : छत्रपती संभाजीनगर येथे नवचेतना साहित्य व सामाजिक मंच आयोजित ‘सन्मान नारीशक्तीचा स्त्रीरत्न पुरस्कार’ सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता गोविंद मेण यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.संगीता गोविंद मेण या गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असून त्यांनी रक्तदान शिबिरे, पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण व झाडांचे मोफत वाटप, निःशुल्क योग प्रशिक्षण, तसेच गरजू नागरिकांना मदत असे अनेक उपक्रम राबविले आहेत. एकल पालक महिलांसाठी हळदीकुंकू सोहळ्यांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
त्या पतंजली योग समिती व लोकजागर परिवाराच्या माध्यमातूनही विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांत योगदान देत आहेत. त्यांच्या निःस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल घेत नवचेतना साहित्य मंच, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने त्यांना ‘स्त्रीरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास डॉ. जिगेसर (मराठी अभ्यासक मंडळ, संभाजीनगर), डॉ. प्रिया धारूरकर (ज्येष्ठ कवी व साहित्यिक), डॉ. विजयकुमार पांचाळ (प्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक), डॉ. प्रमोद घोरपडे ‘कांतीसुत’ (सुप्रसिद्ध कवी व संशोधक), मा. पूजा शेळके (नागपूर पोलिस उपनिरीक्षक), साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे, पवन शेळके सर, सोमेश खेडकर व सुमित्रा सृष्टी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास बहुसंख्य कवी, साहित्यिक व प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ.संगीता गोविंद मेण यांनी आयोजकांचे आभार मानत समाजकार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच पतंजली योग समिती व लोकजागर परिवाराच्या वतीने त्यांनी आयोजक टीमचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



