लोकविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा

लोकविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा
संगीत खुर्ची स्पर्धेत महिलांचा जल्लोष; विजेत्यांना पैठणी साडीचे बक्षीस
जामखेड प्रतिनिधी – ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे
महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला.
जामखेड येथील लोकविकास सेवाभावी संस्था यांच्या वतीने ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये २० वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आनंदात महिला दिन साजरा केला. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सरपंच गफ्फार भाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य दिनकर टापरे आणि नगरपरिषद अधिकारी महेश कवादे उपस्थित होते.
यावेळी विजेत्या महिलांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. तसेच लोकविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थिनी व महिलांसाठीही विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती.
यावेळी गफ्फार भाई पठाण म्हणाले की, पुढील वर्षी आणखी वेगवेगळ्या स्पर्धांचे नियोजन करण्यात येईल आणि त्यासाठी लागणारी बक्षिसे देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.
यावेळी दिपाली बांदल यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष मुस्तफा शेख (मेजर) यांनी महिलादिनाच्या शुभेच्छा देत दर वर्षी महिला दिन आनंदात साजरा करू असे म्हणाले.
संस्थेचे उपाध्यक्ष राजू शिंदे यांनी लोकविकास सेवाभावी संस्थेच्या कार्याची माहिती देत संस्थेमार्फत एकल महिला, भटके-विमुक्त आदिवासी तसेच गरजू महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.
दिनकर भाऊ टापरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महिला या कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीची आधारस्तंभ आहेत. महिलांना समान संधी, सन्मान आणि सुरक्षितता मिळाली तरच समाजाचा खरा विकास होऊ शकतो. असे सांगून त्यांनी महिलांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्रीताई मोरे, दिपालीताई बांदल, सीमा मोरे, विशाल शिंदे, वाहेद भाई सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले.



