बीड

राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ विशेष योजना सुरू

राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ विशेष योजना सुरू

बीजेएस व महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार

जामखे प्रतिनिधी : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक गावांमधील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेअंतर्गत तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असून, संपूर्ण राज्यात यासाठी एकच निश्चित दर लागू करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा. तसेच, तलावातून काढलेला गाळ शेतामध्ये वापरण्यासाठी अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, विधवा, अपंग शेतकरी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदान प्रदान केले जाणार आहे.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गावागावात ही योजना पोहोचवणे, शेतकऱ्यांना गाळ घेण्यास प्रोत्साहित करणे, जनजागृती करणे आणि मागणी अर्ज निर्माण करणे यासाठी बीजेएस कार्यरत आहे. बीजेएसला जलसंधारण क्षेत्रात १२ वर्षांचा व्यापक अनुभव असून, हजारो गावांमध्ये त्यांनी पाणी व्यवस्थापनाची प्रभावी कामे केली आहेत.

योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’वर ऑनलाइन भरावा. यासाठी बीजेएसने सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षित जिल्हा समन्वयक नेमले आहेत. तसेच, बीजेएसचे हजारो कार्यकर्ते ग्रामपंचायती, शेतकरी आणि प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य करण्यास तत्पर आहेत. योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे.

योजनेची संपूर्ण माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध असून, अर्ज करण्यासाठी ‘www.shiwaar.com’ ही वेबसाइट भेट द्यावी. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने या योजनेंतर्गत अर्ज करून तलाव पुनरुज्जीवन, नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीजेएसचे पदाधिकारी प्रफुल सोळंकी व साहिल भंडारी यांनी केले आहे.
यावेळी तहसीलदार गणेश माळी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, जलसंधारण तालुका उपअभियंता पी. एल. शिंदे यांनी प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे,उपाध्यक्ष महावीर बाफना,बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील,खर्डा येथील सरपंच संजिवनी पाटील,संचालक मंगेश बेदमुथ्था,निखिल बोथरा, बी.जे. एस तालुका उपाध्यक्ष राजेश गांधी, सचिव प्रलेश बोरा,खजिनदार केतन भंडारी, आनंद बोरा, तुषार बोथरा आदी तालुक्यातील सर्व सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक स्वस्त धान्य दुकानदार शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button