अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड गुड मॉर्निंग ग्रुपकडून वृक्षारोपण- ॲड. प्रभाकर आंधळे

बीड | प्रतिनिधी
रायगड गुड मॉर्निंग ग्रुपचे नवनियुक्त अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रायगड गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आज सायंकाळी आयटीआय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी सुरक्षा गार्डसह वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती ग्रुपचे सदस्य ॲड. प्रभाकर आंधळे यांनी दिली.
बीड शहरातील आयटीआय परिसरात दररोज सकाळी शेकडो महिला-पुरुष नागरिक व्यायाम, योगाभ्यास, धावणे आणि वॉकिंगसाठी एकत्र येतात. या नागरिकांना एकत्रित आणून सामाजिक, पर्यावरणपूरक आणि विधायक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने रायगड गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना करण्यात आली. या ग्रुपमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. ग्रुपमध्ये बंडू बप्पा लांडे, मोहन आप्पा डोईफोडे, आहेर दादा, गणेशराव माने, नाईकवाडे आबा, प्रा. संजय काळे, ॲड. साबळे, पी.आय. सानप, प्रा. काकडे नाना, अमोलजी इंगोले, प्राचार्य काळे, ॲड. सरवदे, मोहनरावजी मेंगडे पाटील, जगताप पाटील, युवराज जाधव, डॉ. तुपे, ॲड. प्रभाकर आंधळे, ॲड. मस्कर, बाराहाते सर, प्रा. कदम तात्या, प्रा. क्षीरसागर, प्रा. घुगे बापू, किसन झोडगे, मुख्याध्यापक तांबे, पी.आय. तांदळे तात्या, नवनाथरा, डोईफोडे पाटील, राहुलभाऊ नवले पाटील, इंजि. परजणे पाटील, डॉ. सुनील राऊत (जिजा), ॲड. अजयनाना तांदळे, शिवमूर्ती कुडके, ॲड. अंबादासजी आगे आणि शरदभाऊ डावकर या सदस्यांचा सक्रिय सहभाग आहे.
ग्रुपच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊ खर्च न करता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने ग्रुपच्या सदस्यांनी स्वखर्चाने व आर्थिक वर्गणी करून वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला.
लागवड केलेली झाडे केवळ लावून न थांबता ती जगविण्याची जबाबदारीही ग्रुपने स्वीकारली आहे. झाडांना नियमित पाणी देणे, संरक्षणासाठी सुरक्षा गार्डची व्यवस्था करणे आणि सातत्याने निगा राखणे, असा संकल्प सदस्यांनी केला असून पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ॲड. प्रभाकर आंधळे यांनी व्यक्त केला.
यावेळी रायगड गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या उत्साहात उपस्थित होते.



