बीड

“देशहितासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा”  श्री बंकटस्वामी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न.     

“देशहितासाठी जीवनशैलीत बदल गरजेचा”  श्री बंकटस्वामी महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न.
  बीड प्रतिनिधी दिनांक 15 मे 2026 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सार्वजनिक वाहतुकीचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह, परदेश दौरे टाळणे तसेच जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करता देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी विशेषतः कर्मचाऱ्यांना आवाहन केले की, महाविद्यालयाकडे येताना ज्यांच्याकडे सायकल उपलब्ध आहे त्यांनी सायकलीचा वापर करावा. तसेच स्वदेशी वस्तूंच्या खरेदीकडे आपला अधिक कल असावा. यासोबतच किमान आठवड्यातून दोन वेळा तरी महाविद्यालयात येताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा किंवा जवळ राहणारे दोन कर्मचारी असल्यास बाईक शेअरिंग (Bike Sharing) पद्धतीचा अवलंब करावा, असेही त्यांनी सुचविले.
कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. अरुण दैतकार तसेच राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही उपस्थितांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, इंधन बचतीवर भर देणे, पर्यावरण संवर्धनासाठी व देश हितासाठी यासारख्या संकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापिका वर्षाताई भोसले, डॉ.जयद्रथ मगर, डॉ.राम आवारे, प्रा. रंणजित आखाडे, प्रा.रमेश वळवी, श्री प्रशांत कोल्हे, श्री गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयात विविध जनजागृती उपक्रम, चर्चासत्रे व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक प्राध्यापक, स्वयंसेवक विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Back to top button