बीड

विधानपरिषदेतील लक्षवेधीला मंत्री पंकजाताई मुंडेंचे परफेक्ट उत्तर

विधानपरिषदेतील लक्षवेधीला मंत्री पंकजाताई मुंडेंचे परफेक्ट उत्तर

*नाग नदी प्रदूषण निर्मूलनासाठीची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न*

नागपूर, ।दिनांक ०९।:राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नागपूर येथील नाग नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पाच्या १,९२६ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य डॉ.परिणय फुके यांनी नाग नदी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला. यावर पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात परफेक्ट उत्तर दिले.

पर्यावरणाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या, नाग नदी प्रदूषण निर्मूलनाबाबत एकूण पाच पॅकेजेसमध्ये कामाचे नियोजन केले जात आहे. यामध्ये एसटीपी, सिवरेज लाईन, विद्युत शव दाहिनी आदींचा समावेश आहे. नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत ९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल शुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे. नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुढे सोडण्यात येत आहे, त्यामुळे गोसीखुर्द धरणातील मासेमारी नियमित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

एसटीपी प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प बंद असल्याबाबत सदस्य डॉ.परिणय फुके यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत एका समितीच्या माध्यमातून पुन्हा तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण उपाययोजनांसाठी जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात येत असल्याची माहिती देऊन जायका कंपनीच्या निकषांनुसार सर्व कामे करण्यात येत असून सर्व कामे नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
••••

Back to top button