बीड
कामचुकार कंत्राटदारांवर नगरपरिषदेचा ‘दंडुका’ श्रीवर्धनमध्ये अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिक संतप्त; नगराध्यक्ष अतुल चौगुले यांचे कडक कारवाईचे संकेत

कामचुकार कंत्राटदारांवर नगरपरिषदेचा ‘दंडुका’
श्रीवर्धनमध्ये अपूर्ण रस्त्यांमुळे नागरिक संतप्त; नगराध्यक्ष अतुल चौगुले यांचे कडक कारवाईचे संकेत
श्रीवर्धन (संदेश घोलप): श्रीवर्धन शहरातील अपूर्ण रस्ते आणि निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून आता नगरपरिषदेने कामचुकार कंत्राटदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अनेक ठिकाणी रस्ते आणि गटारांची कामे अपूर्ण असल्याने शहरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, गटारांची दुरुस्ती, तसेच काँक्रीट स्लॅब बसवण्याची कामे सुरू असली तरी ती अत्यंत संथ गतीने होत आहेत. अनेक कंत्राटदारांनी कामे पोटठेकेदारांना दिल्यामुळे अनुभवाच्या अभावातून कामांचा दर्जा घसरल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, काम पूर्ण करण्याच्या मुदती उलटूनही अनेक प्रकल्प रखडलेले आहेत.
विशेष म्हणजे, जीवना बंदर परिसरातील श्रीराम मंदिराकडे जाणारा रस्ता अद्यापही कच्च्या अवस्थेत असून, पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कंत्राट घेऊनही संबंधित कंत्राटदाराने काम सुरूच केलेले नाही. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे अपूर्ण कामांमुळे परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोदकाम केलेली गटारे आणि अर्धवट रस्ते नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने कामे पूर्ण करण्याची आणि निष्क्रिय कंत्राटदारांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “ज्या कंत्राटदारांनी कामे अपूर्ण ठेवली आहेत, मुदती ओलांडल्या आहेत किंवा निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत, त्यांना कायदेशीर नोटिसा देण्यात येतील. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून संबंधितांना काळ्या यादीत टाकण्यात येईल.”
नगरपरिषदेच्या या भूमिकेमुळे कामचुकार कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत प्रशासनाकडून ठोस कारवाई होण्याची शक्यता आहे.



