जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी रस्त्याचे काम मंदगतीने, नेते मौन, युवक आक्रमक! जामखेडचे युवक रस्त्यावर

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी रस्त्याचे काम मंदगतीने, नेते मौन, युवक आक्रमक! जामखेडचे युवक रस्त्यावर
शहरातील अतिक्रमण तातडीने हटवाव ; अन्यथा उपोषण
आमदार, विधान परिषद सभापती व खासदार गप्प का?
जामखेड (ता. जामखेड) —राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी लगत असलेल्या जामखेड शहरातील खर्डा रोड ते बीड रोड दरम्यानचे अतिक्रमण तातडीने काढावे तसेच महामार्गाचे काम दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील कुसडगाव सह आदी गावांतील युवकांनी पुढाकार घेऊन तहसीलदार व नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर वैभव कार्ले, प्रशांत कात्रजकर, दत्तात्रय सरनोबत, गणेश गायकवाड, योगेश कात्रजकर, गणेश कार्ले,सुरज राऊत, गणेश खेत्रे,मनोज अब्दुले, चंद्रकांत कार्ले, विजय मोरे, सोपान जरांडे, रोहित चव्हाण, स्वप्निल शेळके,पवन आजबे,बाळु नेटके,राम जगदाळे ,सागर डिसले,शुभम आजबे, राहुल आजबे, अशोक राळेभात, आप्पासाहेब आजबे, छगन आजबे, बाळासाहेब आजबे आदी युवकांच्या सह्या आहेत.
सकाळी युवकांनी शहरातून आक्रोश मोर्चा काढला. मागील तीन वर्षांपासून रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, पावसाळ्यात साचणारे पाणी व वारंवार होणारे अपघात यांचा त्रास सहन करावा लागत आहे.येत्या आठ दिवसानंतर कुठलीही कारवाई न झाल्यास सर्व युवक हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असून यामध्ये जामखेड शहरातील सर्व माता-भगिनी, युवक व तालुक्यातील खेड्यापाड्यातून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,अतिक्रमण काढण्याचे काम केवळ गोरगरीबांच्या हातगाड्या, टपऱ्या हटवण्यापुरतेच मर्यादित आहे. मोठ्या व्यापाऱ्यांना नेत्यांचे व अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे गेली वीस वर्षे अतिक्रमण कायम आहे. या हलगर्जीपणामुळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
*रस्त्यावर उतरून युवकांचा रोष….*
जामखेड तालुक्याला आमदार आहेत,विधान परिषद सभापती आहेत, जिल्ह्याचे खासदार आहेत, तरीही हे सर्वजण या गंभीर प्रश्नावर गप्प का आहेत? नागरिकांचे हाल होत असताना जबाबदार लोकप्रतिनिधी मौन का साधतात?
*आठ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास ; युवकांचा उग्र आंदोलन छेडून उपोषणाचा इशारा*
शहरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर नागरिकांचे हाल होत असताना कुठे गायब आहेत? आता सामान्य जनतेच्या हक्कांसाठी तालुक्यातील कुसडगाव यांच्या सह अनेक गावांतील युवकच पुढे सरसावले आहेत,असे संतप्त युवकांनी सांगितले.



