बीड

ज्ञान आणि संस्कारांच्या शिदोरीवर आयुष्याचा नवीन प्रवास यशस्वी करा-डॉ.आदिती सारडा

ज्ञान आणि संस्कारांच्या शिदोरीवर आयुष्याचा नवीन प्रवास यशस्वी करा-डॉ.आदिती सारडा

आदित्य फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप.
प्रतिनिधी | बीड
निरोप समारंभ हा केवळ आठवणींना उजाळा देणारा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा प्रसंग नसून, तो नवीन संधींच्या सुरुवातीची भावना निर्माण करणारा एक भावनिक क्षण असतो. या पवित्र प्रांगणात तुम्ही जे संस्कार आणि ज्ञान मिळवले आहे, तीच तुमच्या आयुष्याची खरी शिदोरी आहे. या शिदोरीच्या बळावर भविष्यातील नवीन प्रवासात यश मिळवून महाविद्यालयाचे नाव मोठे करा, असे आवाहन आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी केले.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य फार्मसी व आदित्य डी.फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभ २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दि. ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता महाविद्यालय परिसरात अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात हा सोहळा पार पडला. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला ३०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदित्य फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.आर.पवार यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी गुरुकिल्ली दिली. ते म्हणाले, स्वप्न पाहणे सोपे असते, पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अपार मेहनत आणि सातत्याची गरज असते. विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठ्या पदांवर पोहोचून देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. आदित्य डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर. शिंदे म्हणाले, निरोप म्हणजे कायमचे दूर जाणे नव्हे, तर नवीन जबाबदाऱ्यांकडे वाटचाल करणे होय. महाविद्यालयाचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच उघडे राहतील. आयुष्यात मोठे होताना माणुसकी जपा,अशी भावनिक साद त्यांनी विद्यार्थ्यांना घातली.
या प्रसंगी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आपल्या प्रवासाला उजाळा दिला. विद्यार्थी भावना शिलीमकर मनोगत व्यक्त करताना, शैक्षणिक प्रवासात महाविद्यालय आणि संस्था कशाप्रकारे नेहमी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर आदित्य मुंजाळ ने प्राध्यापकांच्या मेहनतीचे कौतुक करत, महाविद्यालयात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर कसा भर दिला जातो,याचे अनुभव कथन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. डी. आर. पवार, प्राचार्य डॉ. आर. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.गोविंद मुंडे, डॉ. देवेश चव्हाण, डॉ. विशाल सनान्से, प्रा. प्रसाद चव्हाण, प्रा. मुंजाजी मुळे, प्रा.चैतन्य कुटे, प्रा. शितल शिंदे, प्रा. रोहिणी जाधव, प्रा. शुभम रांदड, प्रा. स्वाती धस, प्रा. शिवाजी तोरकड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन २०२३ बॅचच्या ऐश्वर्या घुघे व रुपाली मुळे यांनी केले, तर २०२३ बॅचचा विद्यार्थी अक्षय मुंढे याने आभार मानले.

Back to top button