बीड
शिवाजी महाराजांबाबत वक्तव्याचा निषेध; पैठणमध्ये संतापाची लाट

शिवाजी महाराजांबाबत वक्तव्याचा निषेध; पैठणमध्ये संतापाची लाट
वादग्रस्त विधानाने उसळला रोष; शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
पैठण | किरण काळे
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त विधानामुळे पैठण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून विविध शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आणि यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप करत ‘अखंड बहुजन शिवप्रेमी’ व ‘अखंड मराठा समाज’ यांच्या वतीने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार रामदास यांच्या हाती सोपवला होता, असे विधान केले. या वक्तव्यावर इतिहास अभ्यासक व शिवप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. संबंधित विधान हे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे पैठण शहरासह परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
तक्रारदारांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, त्यांना चुकीची माहिती पुरवणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. काही संघटनांनी या प्रकरणात गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाईची मागणी केली आहे.
या निवेदनावर मराठा सेवा संघाचे दादासाहेब पठाडे, अशोक भागवत, महेश पवार, छावाचे किशोर शिरवत, मराठा महासंघाचे अतिष गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे गणेश पवार, अनिल राऊत, छावाचे साईनाथ कर्डिले, सुभाष नवथर, हरिभाऊ शेळके, विशाल काळे, किरण काळे, किशोर सदावर्ते, अंकुश काळे, पवन शिसोदे, रविंद्र ठोसर, नंदकिशोर मगरे, राहूल पगारे, कलिम करीम पठाण, नारायण किरडे, निलेश उढाण, संदिप हंबर्डे, प्रशांत देशमुख , संजय जाधव, प्रमोद आढाव, गणेश औटे, सुधाकर सुलताने, सुरज गोजरे आणि इतर अनेक शिवप्रेमींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, पैठण पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



