अफवांना पूर्णविराम : बुलढाणा अर्बन बँकेच्या सर्व शाखा रविवारीही सुरू, व्यवहार सुरळीत

अफवांना पूर्णविराम : बुलढाणा अर्बन बँकेच्या सर्व शाखा रविवारीही सुरू, व्यवहार सुरळीत
बीड : बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याच्या अफवांमुळे ठेवीदार व ग्राहकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी बँक व्यवस्थापनाने रविवारीदेखील जिल्ह्यातील सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी सर्व शाखा सुरू ठेवून ग्राहकांना नियमित सेवा देण्यात आली.
या परिस्थितीत शाखा व्यवस्थापकांनी ग्राहकांना दिलासा देत बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले. ग्राहकांच्या सोयीसाठी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली असून, सर्वांनी शांतता व शिस्त राखून आपले व्यवहार करावेत, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ बँकेच्या अधिकृत माहितीनुसारच व्यवहार करावेत, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
अफवांमुळे अचानक वाढलेल्या गर्दीचा ताण बँक कर्मचाऱ्यांवर पडला असला तरी सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील होते. घाबरलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या ठेवी तसेच गहाण ठेवलेले सोने नियमानुसार परत देत बँकेने पारदर्शक व्यवहाराचा आदर्श ठेवला.
बुलढाणा अर्बन बँकेच्या संयमित व जबाबदार व्यवस्थापनामुळे ग्राहकांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला असून सध्या बँकेच्या सर्व शाखांमधील व्यवहार नियमितपणे सुरू आहेत. यामुळे खातेदार, ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये बँकेबाबत समाधान व्यक्त होत आहे.



