बीड
‘वारकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ हरवली’ मधुकर महाराज बारूळकर यांना बीडकरांची भावपूर्ण श्रद्धांजली

‘वारकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ हरवली’ मधुकर महाराज बारूळकर यांना बीडकरांची भावपूर्ण श्रद्धांजली
बीड : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज बारूळकर यांच्या निधनाने “वारकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ हरवली” अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत बीड शहरात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या अभिवादन सभेला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी मधुकर महाराजांच्या सामाजिक तसेच सांप्रदायिक कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधान, शेतकरी प्रश्न आणि पुरोगामी विचारधारा यांसारख्या विषयांवर अत्यंत प्रभावीपणे भाष्य करणारे ते एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते, असे मत व्यक्त करण्यात आले. अत्यंत कमी औपचारिक शिक्षण असतानाही त्यांनी शेती व्यवसाय सांभाळत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधनाची चळवळ उभी केली. कीर्तन, प्रवचन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी समाजमनावर ठसा उमटवत जनजागृती केली. विशेष म्हणजे, संत तुकाराम महाराजांच्या अशा अभंगांवर त्यांनी भाष्य केले, ज्यांवर सहसा कोणी बोलत नाही, आणि त्या माध्यमातून समाजाला नवे विचार दिले. कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे पार पाडत त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनवले, ही बाबही उपस्थितांनी विशेषत्वाने अधोरेखित केली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. या प्रसंगी इंजि. गोविंद कदम, प्रा. डी. जी. तांदळे, काशिनाथ वाघमारे, अशोक ठाकरे, सुरेश ढास, पंजाब येडे, रघुनाथ डोंगरे, मारुती वाघ, बबन तांबे, सचिन पिसाळ, संतोष माने, नितीन महाराज पिसाळ, जालिंदर बेंद्रे, सुधाकर शिंदे, डॉ. संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, शिवाजीराव हिंदोळे, गणेश मस्के, विलास सोनवणे, नारायण गवते, अभिमान खरसाडे, दादासाहेब सदोळकर, पवन घाडगे, श्रीकृष्ण उबाळे, संतोष डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.



