बीड

चिंचाळा–शेकापूर–बेलगाव- देसुर–बीडसांगवी परिसरात अतिवृष्टीचा तडाखा – शेती पाण्याखाली, पिकांचे मोठे नुकसान

चिंचाळा–शेकापूर–बेलगाव- देसुर–बीडसांगवी परिसरात अतिवृष्टीचा तडाखा – शेती पाण्याखाली, पिकांचे मोठे नुकसान

आष्टी (प्रतिनिधी) –गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंचाळा, शेकापूर, बेलगाव,देसुर, बीडसांगवी परिसरात नद्या व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे नदीलगतच्या तसेच नाल्यालगतच्या शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.

पूराच्या पाण्यात कांदा, सोयाबीन, तूर, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही भागात शेतीतील मातीही वाहून गेल्याने भविष्यात पिकांची पेरणी करणे कठीण होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकरी वर्गासमोर हाती आलेले पीक वाया जाण्याबरोबरच पुढील हंगामासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे ही मोठी समस्या उभी राहिली आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.या पुरस्थितीमुळे चिंचाळा, शेकापूर, बेलगाव,देसुर व बीडसांगवी परिसरातील रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शेतकरी वर्गावर आलेल्या या संकटाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मदतकार्य सुरू करावे, अशी सर्वांचीच मागणी आहे.

Back to top button