📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जीवघेण्या डीजेवर कायमस्वरूपी बंदी हवी !

जीवघेण्या डीजेवर कायमस्वरूपी बंदी हवी !
             सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर निर्बंध आणले आहेत, तर मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवर याआधीच बंदी घातली आहे. ही बंदी कायम ठेवून गणेशोत्सवादरम्यान डीजे अथवा डॉल्बी वाजवलयास मंडळावर कडक कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. कौटुंबिक कार्यक्रम असो वा सांस्कृतिक किंवा एखादा सार्वजनिक उत्सव वा महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी अशा ठिकाणी लोकांची गर्दी जमवायची असेल, तर डीजे वाजलाच पाहिजे असे काहीसे समीकरण गेल्या काही वर्षांत तयार होऊ लागले आहे. प्रचंड आवाजामुळे ध्वनी प्रदूषणासह आरोग्याची हानी करणारा डीजे हळूहळू आधुनिक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनू लागला आहे. पळ;पळ;ल;विकल;मार्च-एप्रिल महिन्यात लगीन सराई  जोमाने होती अशा ठिकाणी मित्र परिवाराला खुश करण्यासाठी मद्यपानाच्या मेजवान्यांसह थिरकण्यासाठी वरातीत डीजेची सोय केली गेल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईसारख्या ठिकाणी गल्लीबोळांतही डीजे वाजू लागला कि कार्यक्रम कोणाचा आहे हे न पाहता नाचण्यास उत्सुक असणाऱ्या मंडळींचे पाय डीजेच्या आवाजाच्या दिशेने वळताना पाहायला मिळतात. डीजेची व्यवस्था करायची तर खर्चही अधिक येतो, अशावेळी बाकीच्या खर्चाशी तडजोड करून डीजेला प्राधान्य देणारी मंडळीही हल्ली बरीच पाहायला मिळतात. सार्वजनिक उत्सव, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी यानिमित्ताने काढल्या जाणाऱ्या मिरवणुका यांमध्ये डीजे वाजवणे जणू अनिवार्यच झाले आहे. एखाद्या देवतेच्या गाण्याने वाजायला सुरुवात करणारा हा डीजे हळूहळू रंगात येऊन कधी ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘एक बोतल व्होडका काम मेरा रोज का’ यांसारख्या गाण्यांवर सरकतो हे कळतही नाही आणि या मिरवणुकीत चित्रविचित्र अंगविक्षेप करत नाचणारी मंडळीही अशी गाणी वाजू लागली की अधिक जोमाने धिंगाणा घालू लागतात. आपण कोणत्या महापुरुषाच्या मिरवणुकीत नाचतो आहोत, त्यांची शिकवण काय, आपल्याला असे थिरकताना पाहून त्या महापुरुषांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याचा तिळमात्र विचार या मंडळींकडून केला जात नाही. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत मंगलवाद्यांसह काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत मोजकीच मंडळी दिसतील मात्र ज्या मिरवणुकीत डीजे वाजवला जातोय अशा ठिकाणी आजूबाजूला हजारोंचा समुदाय पाहायला मिळतो.  
             डीजेमुळे आरोग्यावर होणाऱ्या भयंकर परिणामांमुळे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच डीजे वाजवण्यावर बंधने आणली आहेत. मिरवणुकीत डीजे वाजवण्यास स्वतंत्र परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे, डीजेच्या आवाजाला ४० डेसिबल्सची मर्यादा घालून देण्यात आली आहे; मात्र ही मर्यादा सर्वत्रच ओलांडली जाते. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दाखल घेत अनेक वेळा या डीजेंवर पोलिसांकडून कारवाईही केली जाते, तरीही डीजे वाजवणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. नुकत्याच पार पडलेल्या दहीकाला उत्सवाच्या निमित्ताने मुंबई, ठाणे आणि पुणेसह अनेक शहरांत लाखोंची बक्षिसे मिळवून देणाऱ्या दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या त्यापैकी जवळपास ९० टक्के हंड्या या राजकीय मंडळींनी पुरस्कृत केलेल्या होत्या. यातील बहुतांश हंड्यांमध्ये चढ्या आवाजात डीजे वाजत होते. अनेक हंड्यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील नेतेमंडळींनीही भेटी दिल्या; मात्र डीजेवर असणाऱ्या बंदीचा या सर्वांनाच विसर पडला होता. डीजेचा आपल्याला त्रास नको म्हणून काही मंत्र्यांनी चक्क कानात कापसाचे बोळे भरल्याचे काही पत्रकारांनी टिपले. आपलाच विचार करणारी ही मंडळी सामान्य जनतेचा विचार केव्हा करणार आहेत असा संतप्त सवाल यानिमित्ताने नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने वाजणाऱ्या डीजेचा सर्वाधिक त्रास होतो तो जेष्ठ नागरिकांना. डीजेवर न्यायालयाने घातलेल्या बंदीचा विचार करून सरकारने त्यावर ठोस उपाययोजना करावी यासाठी साताऱ्यातील जेष्ठ नागरिक संघाने गांधी मैदान ते पोवई नाका असा भर पावसात निषेध मोर्चा काढल्याचे वृत्त नुकतेच वाचनात आले. 
                 यंदा नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत आलेल्या नितीन रणशिंगे या २३ वर्षीय तरुणाचा नाकातोंडातून रक्तस्त्राव होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. नितीनला अन्य आजारही असले तरी त्याच्या मृत्यूला डीजेचे निमित्त झाले. सोलापुरात एका मिरवणुकीत नाचताना अभिषेक बिराजदार नावाच्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे हल्लीच वाचनात आले.  मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सोलापुरात एका मुलीच्या हळद समारंभात डीजेच्या आवाजामुळे मुलीच्या वडिलांचाच मृत्यू ओढवला. याच वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीसाठी पुण्यातून १५ डीजे मागवण्यात आले होते. डीजेच्या जीवघेण्या आवाजामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. ज्यामुळे त्याच संध्याकाळी कानाच्या त्रासामुळे परिसरातील ७० रुग्णालयांत मिळून  २५० रुग्ण भरती झाले.  नागपूरमध्ये एका लग्नाच्या वरातीत डीजे वाजत असताना डीजेच्या आवाजातील कंपनांमुळे जवळची एक मोठी  भिंत कोसळली, ज्यामुळे वरातीत सहभागी झालेले कित्येक जण रक्तबंबाळ झाल्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. याशिवाय डीजेवर थिरकणाऱ्या तरुणांमध्ये आपापसांत भांडणे होऊन एकमेकांची डोकी फोडण्याच्या, आवाज वाढवण्यासाठी किंवा मनासारखी गाणी लावण्यासाठी डीजे वाजवणाऱ्यावर दबाव आणण्याच्या, प्रसंगी त्याला मारहाण करण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. 
                 डीजेच्या जीवघेण्या आवाजामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनीप्रदूषण तर होतेच शिवाय या आवाजातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे खिडक्या आणि तावदानांच्या काचांना तडे जातात, लहान मुले, वयोवृद्धांच्या हृदयाला त्रास होतात, अनेक यंत्र बंद पडतात, मांडणीवरील भांडी कोसळतात, भिंतींनाही तडे जातात, रक्तदाब वाढू शकतो, हृदयरोग असणाऱ्या मंडळींना डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कर्कश आवाजामुळे कानाच्या अंतर्गत पेशींना इजा होऊन बहिरेपणा येऊ शकतो. डीजेमुळे गरोदर स्त्रियांचे हृदयाचे ठोके वाढून वेळेपूर्वी प्रसूती होण्याचे, प्रसंगी गर्भापात होण्याचीही शक्यता असते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते डीजेच्या आवाजामुळे त्वचारोगही बळावतात. डीजेचा आवाज सतत कानी पडल्याने चिडचिड होणे, निद्रानाश, नैराश्य येणे यांसारखे मानसिक विकार उद्भवण्याचा धोका असल्याचे मानसोपचारतज्ञ सांगतात. डीजेमुळे होणारी सामाजिक, शारीरिक आणि मानसिक हानी लक्षात घेऊन न्यायालयाने यावर निर्बंध आणले असले तरी लोकांच्या हौसेपुढे ते सर्रासपणे पायदळी तुडवले जातात. गेल्या काही वर्षांत वाढदिवस, लग्न, मिरवणूका यांमध्ये डीजे वाजवण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, ज्यामुळे घरच्या कार्यक्रमात डीजे वाजवणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागले आहे. सण उत्सवांत डीजे वाजवणे हा आपला जन्मसिद्ध अधिकारच असल्याची भावना आजच्या पिढीत निर्माण होऊ लागली आहे. अशावेळी पोलिस प्रशासन, न्यायालय यांच्याकडून घालण्यात आलेले नियम लोकांना दडपशाहीचा भाग वाटतात, राजकीय नेतेमंडळीही तरुणांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बिनधास्तपणे डीजे वाजवण्याचे आवाहन करतात. काही तासांच्या मौजेसाठी लोकांना दीर्घ आजार देणारी, प्रसंगी त्यांचा जीव घेणारी असली प्राणघातक  प्रतिष्ठा काय कामाची ? त्यामुळे डीजेवर कायमस्वरूपी बंदी येण्यासाठी राजकीय मंडळांची इच्छाशक्ती, पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि नागरिकांचा सहभाग नितांत गरजेचा आहे. 
 
 
 
Back to top button