बीड
लँडाळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे उपळी येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन

लँडाळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे उपळी येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन
तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती; ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत तपासणी व उपचारांचा लाभ
माजलगाव / प्रतिनिधी :उपळी ता. वडवणी येथे लँडाळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, माजलगाव यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरास परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला असून शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची सखोल तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, हाडांचे आजार, सामान्य आजार तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांवर तपासणी करून रुग्णांना योग्य उपचार व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या आरोग्य शिबिरामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्य समस्यांची प्राथमिक तपासणी होऊन त्यांना दिलासा मिळाला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, वैद्यकीय पथक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.



