बीड

कारधा पोलिसांकडून ६.०६ लाखांचा वाळूसाठा जप्त; एक अटकेत.

कारधा पोलिसांकडून ६.०६ लाखांचा वाळूसाठा जप्त; एक अटकेत.
*दै, सूर्योदय*:- भंडारा:-कारधा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करीत ६ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२५ रोजी पहाटे १ वाजून १० मिनिटांनी कारधा पोलीस ठाण्याचे पो.हवा. दिलीप भाऊराव धावडे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना, त्यांना एमएच-३६-एएल ४५७० क्रमांकाचा एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह संशयास्पद स्थितीत आढळला. या ट्रॅक्टरमध्ये शासनाची मालकीची वाळू कोणतीही परवानगी नसताना चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर चालक सुदर्शन मधुसूदन मते (वय २२, रा. मंडणगाव, पोस्ट मांडवी, ता.जि. भंडारा) याला ताब्यात घेतले. त्याने शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाची हानी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ लाख रुपये किमतीचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. एमएच-३६-एएल ४५७०), १ लाख रुपये किमतीची लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली आणि ६ हजार रुपये किमतीची १ ब्रास वाळू असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी पो.हवा. दिलीप भाऊराव धावडे यांच्या लेखी अहवालावरून आरोपीविरुद्ध अप. क्र. ३४४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०२(२), ४९ सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पो.नि. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. साठवने,पो.स्टे. कारधा यांनी केली. पुढील तपास कारधा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
Back to top button