बीड
पांदण रस्त्यांसह रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे हाती घ्या – आ.धनंजय मुंडे

पांदण रस्त्यांसह रोजगार हमी योजनेची जास्तीत जास्त कामे हाती घ्या – आ.धनंजय मुंडे
*आ.धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातील दुष्काळासह पांदण रस्ते, रोजगार हमी, चारा – पाणी पुरवठा इत्यादी बाबत घेतला सविस्तर आढावा*
*तलावातील पाणी उपसा 100% बंद, पिण्याच्या पाण्याचे बारकाईने नियोजन करण्याचे धनंजय मुंडेंचे निर्देश*
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – परळी मतदारसंघात मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद रस्ते योजनेतून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे नियोजन करण्यासह ग्रामीण मजुरांना रोजगार मिळावा यादृष्टीने रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक कामे हाती घेण्यात यावीत, अशा सूचना माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणंद रस्ते, रोजगार हमी योजनेतील विविध कामे यांसह दुष्काळ निवारणासंदर्भात विविध उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रदीर्घ व सखोल आढावा घेतला.
चारा टंचाईच्या आगामी संकटाच्या पार्श्वभूमीवर छावण्या किंवा तत्सम उपाययोजना करण्यासंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करणे, तसेच विविध साठवण तलावातील १००% पाणी उपसा बंद करून पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करणे, नवीन बोअरवेल साठी संपूर्ण पडताळणी करूनच परवानगी देणे, रब्बी पेरणीचा संपूर्ण अहवाल, धान्य पुरवठा दुकानांमधून तक्रारींचा निपटारा करून योग्य पद्धतीने धान्य वितरण करणे, जनावरांचे आरोग्य शिबिर व लसीकरण करणे इत्यादीबाबतची माहिती घेत आ मुंडे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना केल्या. तसेच परळी मतदारसंघातील उपलब्ध पाणी साठ्याचीही माहिती घेतली.
यावेळी अजय मुंडे, सूर्यभान नाना मुंडे, पांदण रस्ते समितीचे सहअध्यक्ष अमर गित्ते, चंद्रकांत कराड, वैजनाथराव सोळंके, राजाभाऊ पौळ, प्रा. मधुकर आघाव, मोहनराव सोळंके, शरद पाटील राडकर, विनायकराव राठोड, आबासाहेब पांडे, बाबासाहेब काळे, बापूसाहेब गित्ते, माऊली तात्या गडदे तसेच उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, तालुका कृषी अधिकारी अर्चना नागरगोजे, यांसह पशु, आरोग्य, जलसंधारण आदी विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
*चार तासांचा जनता संवाद!*
सदरील बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी जनता संवाद या त्यांच्या नेहमीच्या उपक्रमांतर्गत शासकीय विश्रामगृह येथे आलेल्या स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या समस्या ऐकून घेत त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी संबंधितांना योग्य त्या प्रकारे संपर्क करत सूचना दिल्या.



