बीड

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प

फटाके न फोडता, दिवे लावूया, पर्यावरण वाचवूया

जामखेड प्रतिनिधी :शहरातील रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय, जामखेड येथे दिवाळी सणाचे औचित्य साधून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करूया” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया” अशी शपथ घेतली.

यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी भोर यांनी विद्यार्थिनींना दिवाळीचा खरा अर्थ समजावून सांगितला. त्यांनी म्हटले की, “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. आपण दिव्यांच्या प्रकाशाने आपले जीवन उजळवतो. मात्र आजच्या काळात फटाक्यांमुळे सणाचा आनंद प्रदूषणात हरवतो. त्यामुळे आपल्याला निसर्गाशी सुसंवाद साधणारी दिवाळी साजरी करायला हवी.

यानंतर नामदेव सरकुंडे व शंभुदेव बडे यांनी फटाके वाजवल्यामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, फटाक्यांमधून निघणारा धूर आणि रसायने हवा व ध्वनी प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे श्वसनाचे विकार, हृदयाचे आजार, निद्रानाश आणि तणाव निर्माण होतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि प्राण्यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो.

या दरम्यान विद्यार्थिनींनी प्रतिज्ञा घेतली की,आम्ही फटाके फोडणार नाही, दिवे लावून दिवाळी साजरी करू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि फटाक्यांवर होणारा खर्च वाचवून गरीब व गरजू व्यक्तींना मदत करू.या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली. यावेळी पर्यवेक्षक संजय हजारे आदी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Back to top button