बीड

धानोरा रोडवरील रेल्वे पुलाखाली साचले पाणी वाहतूक ठप्प; संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन, खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर व जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत आंदोलन मागे

धानोरा रोडवरील रेल्वे पुलाखाली साचले पाणी
वाहतूक ठप्प; संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन, खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीनंतर व जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत आंदोलन मागे
बीड (प्रतिनिधी) शहरातील धानोरा रोडवरील रेल्वे पुलाखाली पावसाचे पाणी साचल्याने ये-जा करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. अडथळा दूर करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने पुलावरून जाणाऱ्या मार्गावर मुरूम काढण्याचे काम सुरू केल्याने पर्यायी मार्गही बंद झाला. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी पुलाजवळ ठिय्या देत तीव्र आंदोलन छेडले.
आहेर धानोरा, वरवटी, मांडवजाळी, लिंबागणेश या गावांना बीड शहराशी जोडणारा मुख्य मार्ग असलेल्या धानोरा रोड परिसरात रेल्वे स्थानक उभारण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे पुलाखालील खोलगट भाग असलेला रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरून दैनंदिन कामासाठी शहरात येणाऱ्या शेकडो नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून पुलावरील रेल्वे रुळाच्या बाजूनेच वाहतूक करावी लागत होती.
मात्र रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी पर्यायी मार्गावरील मुरूम हटवण्याचे काम अचानक सुरू केल्याने नागरिकांचा एकमेव उरलेला मार्गही बंद झाला. त्यामुळे वरवंटी आहेर धानोराचे ग्रुप ग्रामपंचायतचे उप सरपंच प्रदीप कोटुळे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्पझाली. नागरिकांनी रोष व्यक्त करत घोषणाबाजी केली. या प्रकारची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांना कळल्यानंतर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत रुळावरील मुरूम काढण्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले. पुलाखालील असलेले पाणी उपसून रस्ता मोकळा होईपर्यंत रेल्वे रुळाच्या बाजूने वाहतूक सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाच्या या आश्वासनावर ग्रामस्थांनी आंदोलन शांततेत मागे घेतले.
———-
*चौकट*
कायमचा प्रश्न सोडवा,  सोमवारी पुन्हा आंदोलन
धानोरा रोडवरील रेल्वे पुलाखाली पाणी साचणे दरवर्षी पावसाळ्यात होणारी नित्याची समस्या आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे येत्या सोमवारी पर्यंत पुलाखाली साचलेले पाणी प्रश्न कायम मार्गी लावावा अन्यथा मंगळवारपासून रेल्वे पुलाखाली आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे असे उपसरपंच प्रदीप कोठुळे यांनी प्रशासनाला सुनावले. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी खासदार बजरंग सोनवणे आणि प्रशासनामध्ये समन्वय साधून ग्रामस्थांचे आंदोलन मागे घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Back to top button