बीड

लिंबागणेश परीसरात मुग काढणीला वेग;  पाऊस – टंचाई मजुरी शेतकऱ्यांना तिहेरी पेच – डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश परीसरात मुग काढणीला वेग;  पाऊस – टंचाई मजुरी शेतकऱ्यांना तिहेरी पेच
– डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश :- (दि.२२)
मृग नक्षत्रात पेरणी झाल्यानंतर उत्पादनाची हमी असल्याने यंदा मुग-उडीद या पिकांचे क्षेत्र लक्षणीय वाढले आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मुगाला प्राधान्य दिले असून प्रारंभीच्या सततच्या पावसामुळे पिकांची वाढ समाधानकारक झाली. परंतु ऐन काढणीच्या वेळी झालेल्या भीज पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सध्या लिंबागणेश शिवारात मुग काढणीला वेग आला आहे. मात्र गेल्या आठवड्यातील रिमझिम पावसामुळे मजुरांचे काम खंडित होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भिज पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता मजुरांच्या टंचाईचा व अधिक मजुरीच्या मागणीचा सामना करावा लागत आहे.

लिंबागणेशचे शेतकरी बालासाहेब जाधव यांनी सांगितले की,
“मुग काढणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज असते. हिश्शेवारी पद्धतीने २ हिस्सा शेतमालकाला व १ हिस्सा मजुरांना असा व्यवहार होतो. पण मजुरांना आणणे-नेणे याचा खर्च शेतकऱ्यालाच करावा लागतो. त्यातच काढणीस विलंब झाल्याने शेंगा फुटणे, मुग पांढरा पडणे व कर येणे यामुळे पिकांचे नुकसान होत आहे.”

मजुरांची कमतरता आणि त्यांच्या वाहतुकीवरील खर्चामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडत असून मुग काढणीच्या हंगामात शेतकरी हतबल झाल्याचे चित्र सध्या लिंबागणेश परिसरात पाहायला मिळत आहे.

Back to top button