बीड

कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले!

कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले!

दुबार पेरणीचे संकट असतानाही अहवालात “पीक परिस्थिती छान”; शेतकऱ्यांचा संताप :- डॉ.गणेश ढवळे

बीड – (दि.१५ जुलै)बीड जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून पावसाने पूर्णतः पाठ फिरवली आहे. खरीप हंगामात पेरणी झालेली पिके धोक्यात आली असून, पावसाअभावी पिकांच्या उगवण क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे. पिके माना टाकू लागली, तर काही ठिकाणी रोपे सुकून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

मात्र अशा स्थितीतही जिल्हा कृषी विभागाने ९ जुलैच्या अहवालात “जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती चांगली” असल्याचे नमूद केले आहे.
यावरून संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट सवाल केला –
“कृषी विभागाचे डोके ठिकाणावर आहे काय?”
हा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे.

जिल्ह्यातील खरी परिस्थिती

९ जुलै अखेर जिल्ह्यात ६,८१,३९८ हेक्टरवर पेरणी (८४.२३%) पूर्ण.

१ जून ते ९ जुलै दरम्यान सरासरी १९४.१ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ १४०.८ मिमी पाऊस.

सर्वात कमी पाऊस धारूर तालुका (४६.१ मिमी) आणि सर्वात जास्त पाऊस वडवणी तालुका (१२९ मिमी).

पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके सुकण्याचा धोका वाढला आहे. वातावरण ढगाळ असले तरी वरून पाऊस बरसत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांचा तीव्र रोष

> “वातानुकूलित कार्यालयात बसून ‘पीक परिस्थिती चांगली’ असा अहवाल देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाते.”
– मोहनराव कोटुळे, शेतकरी लिंबागणेश

लिंबागणेश येथील मोहनराव कोटुळे, दामोधर थोरात, श्रीहरी निर्मळ, चंद्रकांत आवसरे, रमेश गायकवाड, रामचंद्र मुळे, प्रमोद निर्मळ या शेतकऱ्यांनीही कृषी विभागावर रोष व्यक्त केला.

रोग व पिकांचा धोका

यंदा कापसाऐवजी सोयाबीन पेरणी अधिक झाली आहे. परंतु लांबलेल्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटते आहे. पाने खाणाऱ्या अळींचा व अल्प प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. मात्र “यामुळे आर्थिक नुकसान नाही” असा दावा करण्यात आला, जो शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारा ठरला आहे.

🌾 “पीक परिस्थिती छान” म्हणणाऱ्या अहवालामुळे शेतकरी संतप्त – डॉ. गणेश ढवळे

Back to top button