बीड

विद्यार्थिनींनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया कन्या विद्यालय, जामखेड येथे अभिरूप निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला

विद्यार्थिनींनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

कन्या विद्यालय, जामखेड येथे अभिरूप निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला

जामखेड (प्रतिनिधी):कन्या विद्यालय, जामखेड येथे शालेय सामाजिक शास्त्रे विभागाच्या उपक्रमांतर्गत आणि निवडणूक साक्षरता मंचाच्या अंतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींसाठी अभिरूप निवडणूक प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश विद्यार्थिनींमध्ये मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती निर्माण करणे आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणे हा होता.

लोकशाहीचा आत्मा असलेली निवडणूक प्रक्रिया विद्यार्थिनींना समजावी म्हणून दहावीच्या वर्गाचे वर्ग मंत्रिमंडळ लोकशाही मार्गाने निवडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोर आर. आर. व पर्यवेक्षक श्री. हजारे एस. आर. यांचे मार्गदर्शन लाभले.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणूक कार्यक्रमाची औपचारिक घोषणा, उमेदवारी अर्ज सादर करणे, चिन्ह वाटप, प्रचार, मतदान आणि निकाल — या सर्व टप्प्यांचे काटेकोर पालन करण्यात आले. या प्रक्रियेमध्ये मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 आणि इतर कर्मचारी म्हणून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.

ही संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि आधुनिक बनवण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या साहाय्याने ईव्हीएम प्रमाणेच प्रारूप असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तांत्रिक मार्गदर्शन व अंमलबजावणीसाठी विक्रम भोगे व विलास पवार या तंत्रस्नेही शिक्षकांनी प्रभावी कार्य पार पाडले.

या उपक्रमाचे नियोजन व शैक्षणिक मार्गदर्शन सामाजिक शास्त्र विषयाचे शिक्षक सुग्रीव ठाकरे, सचिन डोईफोडे व संजय राठोड यांनी केले.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून श्री मोहन यादव सर, अशोक घोडके, नानासाहेब मोळवणे, शहाजी पवार, शिंदे एस. एम., कोल्हे एम. बी. मॅडम आणि मीरा साळुंखे मॅडम यांनी सहकार्य केले. तसेच निवडणूक निकाल प्रक्रियेत स्वाती लोंढे मॅडम, राजेंद्र ठोंबरे व गणेश जाधव यांचे मोलाचे योगदान लाभले.

या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण २३ विद्यार्थिनींनी उमेदवार म्हणून सहभाग घेतला, तर एकूण २२० विद्यार्थिनींनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये लोकशाही मूल्य, जबाबदारीची भावना, नेतृत्वगुण आणि तंत्रज्ञानाचे उपयुक्त ज्ञान रुजवले गेले. शाळेतील पालकवर्ग व स्थानिक स्कूल कमिटी स्तरावर या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.

Back to top button