बीड

बालमटाकळीत गावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी ; चार लाखांचा ऐवज लंपास, नागरीकात भितीचे वातावरण…!

बालमटाकळीत गावच्या मध्यवस्तीत धाडसी चोरी ; चार लाखांचा ऐवज लंपास, नागरीकात भितीचे वातावरण…!

वृद्ध दांपत्याला मारहाण करत चार लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला…!

अहिल्यानगर:-शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे मंगळवार दि. ८ रोजी गावच्या मध्यवस्तीत मध्यरात्री दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गावच्या पेठेत राहणाऱ्या हिरालाल धोंडलकर यांच्या घरा शेजारील पडक्या जागेतून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटातील तसेच इतर सामानाची उचकापाचक करून हिरालाल धोंडलकर वय ७५ वर्षे यांना मारहाण करून त्यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर वय ७० वर्षे यांना देखील चोरट्याने लोखंडी गजाने मारहाण करत त्यांच्या अंगावरील अंदाजे चार लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने बळजबरीने ओरबडल्याने कानाला मोठी जखम झाली होती. तसेच शेजारील पांडुरंग पाथरकर यांच्या स्टेशनरी दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यामधील तीन हजाराच्या आसपास रोख रक्कम, पंधरा हजार रुपये किमतीचे बेंन्टेक्सचे दागिने तसेच वीस हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान घटनास्थळी ठसे तज्ञांना तसेच श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र ” सीमा ” या श्वानाने घटनास्थळी कुठलाच माघ दाखवला नसल्याने बालमटाकळी सह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी गावचे सरपंच डॉ. राम बामदळे, भारतीय जनता पार्टीचे नेते तुषारभाऊ वैद्य, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, बालमटाकळी सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष कमूभाई शेख आदींनी सदर घटनेचा तपास जलद गतीने करण्याची मागणी केली आहे.

Back to top button