वसतीगृहात रॅगिंगचा व्हायरल व्हिडीओ ; शिक्षणाचं मंदिर की भयाचं केंद्र?

वसतीगृहात रॅगिंगचा व्हायरल व्हिडीओ ; शिक्षणाचं मंदिर की भयाचं केंद्र?
दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन – प्राचार्य विकी घायतडक
जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, काही विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, शिक्षण संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तात्काळ वसतीगृहाला भेट दिली. दुसरीकडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोंगटिवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा स्तरीय चौकशी पथक वसतीगृहात दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. मात्र, वसतीगृहाचे वरिष्ठ अधिकारी अद्यापपर्यंत घटनास्थळी न पोहोचल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.
*प्राचार्य विकी घायतडक यांची प्रतिक्रिया*:
“सदर व्हिडीओची सखोल तपासणी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया प्राचार्य विकी घायतडक यांनी व्यक्त केली आहे.शिक्षणाचं मंदिर की भयाचं केंद्र?त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणात कोणतीही गुप्तता न ठेवता पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.
*रॅगिंग म्हणजे काय?*
रॅगिंग म्हणजे कनिष्ठ विद्यार्थ्यांवर वरिष्ठांकडून होणारा शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक त्रास. ही कृती अमानवी आणि बेकायदेशीर असून खालील प्रकारात येते:
*शारीरिक रॅगिंग: मारहाण, अश्लील कृत्ये करणे.*
*मानसिक रॅगिंग: धमकावणे, अपमान.*
*सामाजिक रॅगिंग: बहिष्कार, वेगळे वागवणे*.
*आर्थिक रॅगिंग: पैसे जबरदस्तीने मागणे, खर्चासाठी दबाव.*
या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता असून, आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे.



