जामखेड तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

जामखेड तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
शिक्षण विभाग नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहील- गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे
जामखेड (प्रतिनिधी- धनराज पवार) – “विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांच्या मेहनतीचे नव्हे तर शिक्षक, पालक आणि शाळेच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या स्वप्नांना बळकटी मिळते. भविष्यात या गुणवंत विद्यार्थ्यांपैकी कोणी वैज्ञानिक, अधिकारी, उद्योजक होईल याची आम्हाला खात्री आहे. शिक्षण विभाग नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहील.” असे मत गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
पंचायत समिती, जामखेड शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 2025 उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात इस्रो सहल, नवोदय परीक्षा, मिशन आरंभ तसेच विविध गुणदर्शन यासारख्या उपक्रमांमध्ये जिल्हास्तरावर यश मिळवलेल्या तसेच तालुकास्तरावर उत्तम कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ म्हणाले,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्यांच्यासाठी केवळ गौरव नव्हे तर पुढील वाटचालीसाठी प्रेरणाही आहे. शिक्षक, पालक आणि शाळांनी घेतलेली मेहनतीचे फलित आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षणाची गुणवत्ता नक्कीच उंचावते.
यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, राम निकम, सुरेश मोहिते, केशव गायकवाड, विक्रम बडे तसेच शिक्षक विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य व प्रेरणादायी ठरले असून, विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालक, शिक्षक व शाळांचे मोलाचे योगदान असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात नमूद केले.
यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि शाळांचे मनःपूर्वक अभिनंदन!



